मुंढव्यात 'सकल हिंदू समाजा'चा निषेध मोर्चा
#घोरपडी
मुंढवा भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लव जिहादची घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढला.
महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवीत हिंदू महिला-मुली आणि स्त्रियांच्या विरोधात होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि धर्मांतराच्या विरोधात घोषणा देत भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 'जागो हिंदू जागो' , 'हर नारी की यही पुकार, साक्षी के हत्यारों का करो संहार', 'शासन करो सक्त कडा दुबारा ना हो हत्यारा खडा' अशा प्रकारचे विविध संदेश देणारे फलक हातामध्ये घेऊन शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नीतेश राणे यांनी केले. तसेच हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, स्वाती मारणे, उज्ज्वला पवार इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी घोरपडीमध्ये घडलेल्या एका प्रकरणातील पीडिता व तिचे कुटुंबीयही मोर्चात सहभागी झाले होते. त्या पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत राणे यांनी लव जिहाद प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
feedback@civicmirror.in