आश्वासने ठरली ‘फेक’, कारवाई फक्त एक
विजय चव्हाण
कारवाई करण्याचे आदेश असतानाही सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर सोसायट्यांच्या आवारातही पारवे आणि कबुतरांचे वास्तव्य वाढू लागले आहे. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे, अस्वच्छतेमुळे दमा, फुफ्फुसाचे विकार यांसारखे आजार नागरिकांना उद्भवत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेषतः न्यायालयानेही अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देऊनही त्याचे महापालिकेकडून पालन होत नसल्याची सद्यस्थिती आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणीनगरमधील आरोग्य कोठी परिसरातील एका नागरिकावर केलेल्या कारवाईचा अपवाद वगळता पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत अन्यत्र कुठेही कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ‘सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी २०१७’ च्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले. मात्र क्षेत्रीय कार्यालयांकडून संबंधित पत्रालाही केराची टोपली दाखवली जात आहे.
एकीकडे शहरात विविध ठिकाणी कबुतरखाने तयार होऊ लागले असतानाच शहरातील वस्त्या, टेकड्या, डोंगर उतारावर कबुतरांच्या ‘ढाबळ’ तयार होऊ लागल्या आहेत. अशा ढाबळी गुन्हेगारीचे केंद्र बनत असूनही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. याऊलट स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासह गुन्हेगारांचाही त्रास होऊ लागल्याची सद्यस्थिती आहे.
खाद्य टाकल्याच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे पत्र सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. संबंधित विभागांना कबुतर, पारवे मोठ्या संख्येने असणाऱ्या ‘क्रॉनिक स्पॉट’ची माहितीही देण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र अशा खाद्य टाकणाऱ्यांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई होते, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली आहे.
छातीविकारतज्ञ मनोज माने यांच्या मते, कबुतर, पारवा अशा पक्ष्यांच्या विष्ठेतून व पंखांमधून पडणाऱ्या घाणीमुळे श्वसनाचे आजार निर्माण होतात. फुफ्फुसाला सूज येण्यापासून ते ॲलर्जीमुळे ‘हायपर सेन्सिटिव्हीटी न्यूमोनिया’सारखा आजार होऊन जीव जाण्याचाही धोका उद्भवतो. ३ वर्षांपूर्वी एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यूही झाला आहे. नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे. कबुतर, पारवे यांना खाद्य टाकण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे त्यांची नैसर्गिक सवय मोडून ते दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. त्यांच्यामुळे नागरिकांना आजार होतात, अनेकदा त्यांच्या थव्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडतात.
पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. त्यांच्या मते, नदीपात्रातील विसर्जन घाट, रस्ता पेठ, सारसबाग, विविध धार्मिक स्थळे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ‘कबुतरखाने’, ‘ढाबळीं’वर कबुतर, पारव्यांचे थवे दिसत आहे. त्यांना अक्षरशः पोत्यांमधून खाद्य आणून टाकले जात आहे. या पक्ष्यांना खाद्य टाकून नागरिकांना श्वसनाचे विविध गंभीर आजार देत त्यांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रकार सुरू आहे. संबंधित गंभीर प्रकार काही जणांच्या जिवावरही बेतला आहे. असे असूनही महापालिका प्रशासन कबुतरांना, पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गांभीर्याने कारवाई न करता त्यांचे अप्रत्यक्षरीत्या लाड पुरवत असल्याचे ढमालेंनी नमूद केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.