टोमणेबाज पुणेरी पाट्या जोरात!
विजय चव्हाण
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेल्या पुणेरी पाट्या पद्धतीच्या फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना ठिकठिकाणी लावलेल्या या पाट्या रंगतदार चर्चेचा विषय ठरत आहेत.
विधानसभेच्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार प्रचारात उतरल्याने रंगत वाढली आहे. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष पोटनिवडणुकीकडे लागले आहे. प्रचार फेऱ्या, सभांमुळे रंगत निर्माण झाली आहे.
पोटनिवडणुकीतील प्रचाराची सांगता येत्या शुक्रवारी (दि. २४) होणार असून रविवारी (दि. २६) मतदान आहे. प्रचार अंतिम टप्यात आला आहे. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मंगळवारी मध्यरात्री कसबा पेठेतील वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागांवर छोटे फलक लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘येथे सोने, चांदी, पैसे इत्यादी सर्व काही स्वीकारले जाईल. टीप- मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल. यंदा कसब्यात धंगेकरच’ असे फलक लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कसबा पेठेत लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.
‘कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लावतो... पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलेही आमिष दाखवू नयेत.’
#यंदाकसब्यातधंगेकरच , असा उल्लेख पाट्यांवर दिसत आहे.
‘‘येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!’’ #यंदाकसब्यातधंगेकरच, असे मजकुराच्या पाट्या आता कसबा मतदारसंघात दिसून आले आहे.
याआधीही, कसब्यात, “आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा… कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा…, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा? आम्ही दाबणार नोटा!” अशा आशयाचे बॅनर कसब्यात झळकू लागले आहेत. या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. तसेच यामुळे ब्राम्हण समाजाची नाराजी उघडपणे दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.