वीजवाहिन्या रातोरात तोडल्या, ४५ ते ५० हजार वीजग्राहक अंधारात
विजय चव्हाण
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नवले ब्रिज ते कात्रज चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या आजूबाजूला असलेली महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरित करण्याचे काम ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. दुसऱ्या बाजूला प्राधिकरणासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि अन्य यंत्रणांकडून विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रास तोडल्या जात असल्याने वीजग्राहक, महावितरणला खंडित वीज पुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये दोघांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
खोदकाम करण्याची विशिष्ट वेळ नसल्याने ते दिवसा किंवा रात्री केव्हाही सुरू असते. यामध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सतत सुरू असल्याने कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ ते ५० हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.
गेल्या पंधरवड्यात ‘एमएनजीएल’ आणि इतर यंत्रणेच्या खोदकामात जेसीबीद्वारे तब्बल १४ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या. २२ केव्ही क्षमतेची एक वीजवाहिनी तोडल्यामुळे हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांना सातत्याने युद्धपातळीवर काम करावे लागत आहे. ‘एमएनजीएल’ च्या खोदकामात गेल्या १५ दिवसांत ८ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. त्यामुळे ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या वाहिन्या पुन्हा जोडण्यासाठी महावितरणला सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा भुरदंड सहन करावा लागला. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे १२ लाख युनिटचे म्हणजे सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी कात्रज पोलीस ठाण्यात महावितरणकडून फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया) रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरित करण्याबाबत अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले. वीज यंत्रणा स्थलांतरित करण्याच्या कामाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. मात्र हे काम ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. विशेष म्हणजे वीजयंत्रणा स्थलांतरित न करता रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आल्याने महावितरणच्या रोड क्रॉस २२ केव्ही क्षमतेच्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या १५ ते २० फूट खोल दबल्या गेल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे अत्यंत खडतर आहे. तसेच त्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.
महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरित करण्यासाठी प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करणे, वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष, दुरुस्तीचा आर्थिक भार, वीज विक्रीचे होणार नुकसान महावितरणला सहन करावे लागत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.