‘पोल’खोल थांबेनाच! ‘पोल’खोल सुरूच!

नागरिकांनी जमा केलेल्या कराच्या पैशातून महापालिकेकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. पण या पैशांमधून खरेदी केलेल्या वस्तूंबाबत पालिका अधिकारी किती सतर्क आहेत, याचा एक गंभीर नमुनाच समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्य भांडारासमोरून विद्युत खांब कापून नेत असल्याचे वृत्त ‘सीविक मिरर’ने प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देणारा महापालिकेचा विद्युत विभाग प्रत्यक्षात मात्र अद्यापही झोपलेलाच आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 1 Mar 2023
  • 12:42 am
‘पोल’खोल थांबेनाच! ‘पोल’खोल सुरूच!

‘पोल’खोल थांबेनाच! ‘पोल’खोल सुरूच!

नायडू शेजारील भांडार विभागाच्या लोखंडी खांबांच्या लूटीचे सत्र सुरूच; विद्युत आणि भांडाराच्या भांडणात चोरट्यांची संख्या झाली चारवरून चाळीस

राजानंद मोरे/ तन्मय ठोंबरे

rajanand.more/tanmay.thombre@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror/@tanmaytmirror

नागरिकांनी जमा केलेल्या कराच्या पैशातून महापालिकेकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. पण या पैशांमधून खरेदी केलेल्या वस्तूंबाबत पालिका अधिकारी किती सतर्क आहेत, याचा एक गंभीर नमुनाच समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्य भांडारासमोरून विद्युत खांब कापून नेत असल्याचे वृत्त ‘सीविक मिरर’ने प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देणारा महापालिकेचा विद्युत विभाग प्रत्यक्षात मात्र अद्यापही झोपलेलाच आहे. शिवाय, भांडार विभागाने नियमावर बोट ठेवत डोळे मिटून घेतले असल्याने अवघ्या १२ दिवसांत खांब चोरीला जाण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे.

नायडू रुग्णालयाशेजारी असलेल्या पालिकेच्या मुख्य भांडार डेपोसमोरून विद्युत खांबांची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याचा प्रकार ‘सीविक मिरर’ने १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला होता. ‘पालिकेवर दिवसाढवळ्या दरोडा’ या मथळ्याखालील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी ‘आम्ही तातडीने उपाययोजना करू,’ असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हा विभाग अद्याप झोपेतच असल्याचे दिसून आले आहे. कारण विद्युत विभागाच्या आश्वासनानंतर १२ दिवस लोटले, मात्र त्या जागेवरील खांब हलवण्यात आले नाहीत. रविवारी (२६ फेब्रुवारी) ८ ते १० महिला कोणतीही भीडभाड न ठेवता विद्युत खांब कापून नेत असल्याचे आढळून आले. या दरोड्याला महापालिकेतीलच एखाद्या घटकाचे पाठबळ नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

नायडू रुग्णालयाशेजारी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचा डेपो आहे. डेपोसमोरील रस्त्यावरच शेकडो नवे-जुने विद्युत खांब, हजारो किलोच्या वायर, पाईप तसेच इतर भंगारातील सामान उघड्यावर टाकण्यात आले आहे. यामध्ये काही वायर नवीन असल्याचे दिसते. बहुतेक साहित्य विद्युत विभागाकडील आहे. समोरील बाजूला डेपो असला तरी या साहित्याकडे त्यांचे लक्ष नसते. 

याच रस्त्यावरून पालिकेच्या कर्मचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असते. रविवारी डेपो बंद असतो, पण आतील बाजूला कर्मचारी असतात. त्यांच्याकडून बाहेरील साहित्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जबाबदारी भांडार विभागाची नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आमच्या परवानगीशिवाय विद्युत विभागाकडून या ठिकाणी साहित्य आणून टाकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे साहित्य बेवारस पडल्यासारखे आहे.

विजेचे खांब दिवसाढवळ्या करवतीने कापून भंगाराच्या दुकानात विकले जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ‘सीविक मिरर’ने केलेल्या स्टींग ऑपरेशननंतर या प्रकाराची पोलखोल झाली. ८ ते १० महिला प्रत्येक रविवारी विद्युत खांब चोरून नेतात. या खांबांची मंगळवार पेठेतील भंगाराच्या दुकानात विक्री करून पैसे कमविले जातात. याबाबत विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावर त्यांनी परिसरातील विद्युत खांबांच्या सुरक्षेसाठी ते आतील बाजूला ठेवले जातील, असे सांगितले होते. तसेच तिथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवू, असेही स्पष्ट केले होते. यातील काही खांब पालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये बसविले जाणार असल्याची माहितीही त्यांनीच दिली होती. पण १२ दिवस उलटून गेले तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

रविवारी (२६ फेब्रुवारी) पुन्हा ८ ते १० महिला खांब कापताना दिसून आल्या. त्यांना याबाबत विचारणा केली असता काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांच्याकडील पोत्यांमध्ये खांबाचे तुकडे होते. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे, आतापर्यंत पालिकेचे किती खांब भंगारात विकले गेले, याचे पालिका अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येथील काही खांब हलविले असून आवश्यकतेनुसार समाविष्ट गावांमध्ये बसविले जात असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात अजूनही शेकडो खांब जागेवर असल्याचे चित्र आहे.

याविषयी विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, ‘‘काही खांब हलविण्यात आले आहेत. समाविष्ट गावांमध्ये मागणीनुसार हे खांब बसविले जात आहेत. तसे संबंधितांना सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आंबेगाव भागात काही खांबांची गरज होती. ते घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यामुळे काही खांब नेले असावेत. कदाचित निवडणूक कामांमुळे खांब हलवायचे राहिले असावे. याबाबत पुन्हा सूचना दिल्या जातील.’’

असे झाले होते स्टींग ऑपरेशन

रविवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी चारच्या सुमारास ‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीला दोन महिला विजेचे खांब करवतीने कापत असल्याचे आढळून आले. काही वेळाने पुन्हा तेथे गेल्यानंतर ७-८ महिला हेच काम करत होत्या. लोखंडी खांबाचे तुकडे करून त्याचा ढीग लावण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने एक दुचाकीस्वार तिथे आला. त्याने पोत्यात भरलेल्या खांबांचे तुकडे नेले. सायंकाळी सातपर्यंत दोन महिला खांब कापण्याचे काम करत होत्या. त्यावेळी एक रिक्षा तिथे आली. सुमारे १५ फुटांचा खांब उचलून थेट रिक्षाच्या छतावर बांधण्यात आला. महिला एका बाजूला खांबाला बांधलेले कापड धरून रिक्षात बसली. तर चार-पाच फुटांचा एक तुकडा घेऊन दोन महिला दुचाकीवरून निघून गेल्या. ‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीने दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला असता रिक्षा आणि दुचाकीवरील महिला शाहीर अमर शेख चौकातून (जुना बाजार) मंगळवार पेठेतून थेट सिंचन भवनजवळील एका भंगार दुकानासमोर थांबतात. तिथे मोठा खांब तसेच तुकड्यांचे वजन करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story