श्लील की अश्लील?

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर खोचक पुणेरी पाट्यांसाठीही प्रसिध्द आहे. पण या खोचक पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणेकरांची मान खाली घालायला लावणाऱ्या अश्लील भिंतीचा ट्रेंडही शहरात दिसू लागला आहे. बोट क्लब रस्ता, ताडीवाला रस्ता या परिसरात काही सोसायट्यांच्या सीमाभिंतींवर अश्लील शेरेबाजी, चित्र काढण्यात आली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Feb 2023
  • 11:15 am
श्लील की अश्लील?

श्लील की अश्लील?

बोट क्लब, नारंगीबाग, ताडीवाला रस्ता परिसरातील भिंतींवर आक्षेपार्ह मजकुरासह तथाकथित अश्लील छायाचित्र; स्थानिक नागरिकांची होत आहे कुचंबणा.

महेंद्र कोल्हे 

feedback@civicmirror.in

TWEET@mahendrakmirror

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर खोचक पुणेरी पाट्यांसाठीही प्रसिध्द आहे. पण या खोचक पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणेकरांची मान खाली घालायला लावणाऱ्या अश्लील भिंतीचा ट्रेंडही शहरात दिसू लागला आहे. बोट क्लब रस्ता, ताडीवाला रस्ता या परिसरात काही सोसायट्यांच्या सीमाभिंतींवर अश्लील शेरेबाजी, चित्र काढण्यात आली आहेत. ग्राफिटीच्या तथाकथित क्रिएटीव्हीटीच्या नावाखाली सार्वजनिक वापरात बंदी असलेले अनेक अश्लील शब्द रेखाटले असून रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला मान खाली घालावी लागत आहे.

स्थानिक रहिवाशांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करूनही संदर्भ लक्षात न आल्याने काहीच कारवाई झाली नाही. पण सीमाभिंती मात्र विद्रूप झाल्या. गेल्या काही दिवसांत विविध प्रकारच्या जाहिरातींसाठी शहरातील अनेक सोसायट्यांच्या सीमा भिंतींवर रंगरंगोटी केली आहे. जी-२० परिषदेपूर्वी पुणे विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर महापालिकेने सर्वच भिंती रंगवत त्यावर चित्र काढली होती. विविध संदेशही दिले होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गतही पालिकेने अनेक भिंती रंगवल्या आहेत, पण पालिकेच्या एवढ्या व्यापातून बोट क्लब, नारंगीबाग आणि ताडीवाला रस्ता परिसरातील भिंती सुटल्या आहेत. या भिंतीवर मोठ्या अक्षरात अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. थेट पुणे शहरासह सर्वच नागरिकांवर टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच काही अश्लील चित्रही दिसून येतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. याबाबत मात्र महापालिका प्रशासन अनभिज्ञ आहे. मागील काही दिवसांपासून भिंतीवर ही चित्रे आहेत.

पालिका प्रशासनाला हे दिसत नाही का, असा सवाल स्थानिक नागरिक असलेले रेवण बिराजदार यांनी केला आहे. पालिकेने शहरातील अनेक सीमाभिंतींवर 'स्वच्छ भारत'चे संदेश लिहिले आहेत, पण काही टवाळखोरांकडून केलेल्या खोडसाळपणाकडे पालिका दुर्लक्ष करताना दिसत असल्याचेही ते म्हणाले.

"लैंगिकता सूचक शब्द लिहिणे ही कृती अश्लील फोन, अश्लील बोलणे, लैंगिकता सूचक शेरे मारणे, अश्लील विनोद सांगणे, टक लावून पाहणे या गुन्ह्यांइतकीच गंभीर बाब आहे. ऑफिस, बाथरूम, लिफ्टच्या भिंतीवर लिखाण किंवा चित्र लावणे इत्यादीबाबत तातडीने कारवाई होते, पण इथे अनेक दिवसांपासून हा मजकूर तसाच रेखाटलेला आहे याचे आश्चर्य वाटते, यामुळे आम्हाला ओशाळल्यासारखे वाटते,अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी असलेल्या मोनिका यांनी  व्यक्त केली आहे. एकीकडे भिंती रंगवताना या अश्लील भिंती का दिसल्या नाहीत, असाही प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे. जरी काही भिंती खासगी मालकीच्या असल्या तरी अनेक मालक बाहेरगावी राहात असल्याने याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी डिपार्टमेंटल स्टोरचे मालक मनीष गुप्ता यांनी केली.

याविषयी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त ज्ञानदेव सुपे म्हणाले, जी २० परिषद तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली आहे, पण या भिंतींबाबत माहिती नाही. तसेच याबाबत आमच्याकडे तक्रारही आलेली नाही. असे काही अश्लील भाषेत लिहिले गेले असेल तर ते पुसावे लागेल. त्याची माहिती घेऊन ते काढले जाईल

काय सांगतो कायदा ?

भारतीय दंड संहिता सेक्शन ५०९ नुसार लैंगिक उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी मजकूर लिहिणे, अंगविक्षेप करणे किंवा याच उद्देशाने एखादी वस्तू दाखवणे असे कृत्य करणाऱ्यास एक वर्षापर्यंत कारावास व दंड ही शिक्षा होऊ शकते. तसेच महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ नुसार जाहिरात नियमावलीनुसार संबंधित जाहिरात फलकास विद्रूपीकरणाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट केले आहे. अशा प्रकारे विद्रूपीकरण करणारी व्यक्ती किंवा त्याचा हस्तक यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर तीन महिने कारावास व पाचशे ते दोन हजार रुपये दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story