एकतर्फी प्रेमातून तरुणीची दुचाकी पेटवली
पुण्यातील लोहेगाव येथील खांडवेनगर परिसरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून १८ वर्षीय तरुणीच्या दुचाकी आणि चारचाकीला आग लावल्याची घटना घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. श्रीराम घाडगे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम हा वाघोली येथील रहिवासी असून त्याचे एका १८ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे, घाडगे हा काही दिवसांपासून तरुणीचा छळ करत होता. याबाबत तरुणीला तिच्या वडीलांनी श्रीरामपासून दूर राहण्याचा देखील सल्ला दिला होता.
तरुणीच्या वडीलांनी दुर राहण्याचा सल्ला दिल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका साथीदारासह पीडितेच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तरुणीच्या दुचाकी आणि तीन गाड्यांवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले.
या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागली. त्यामुळे वाहनांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. या प्रकरणी तरुणीच्या वडीलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. सध्या विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.