पिंपरी सांडसमध्ये पोलिसांचा अवैध हातभट्टीवर छापा
नितीन गांगर्डे
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी सांडस येथील गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा घालून ती उद्ध्वस्त केली. ७० लिटर गावठी विषारी दारू, अडीच हजार लिटर रसायन, दारू गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक कारवाया केल्या जात असतानाही अवैध दारू माफिया बेधडक शहरभर आपले अड्डे चालवत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी सांडस येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातून गावठी हातभट्टी दारूचे बेकायदा धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. गुप्त माहितीवरून लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांची दोन पथके कारवाईसाठी बनवली. काईंगडे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तातडीने दोन पथके तयार करून परिसरातील अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.
पिंपरी सांडस येथील गट नंबर ८३४ मधील एका पडीक जागेवर असलेल्या हातभट्टीवर छापा टाकल्यावर पोलिसांनी ७० लिटर दारू जप्त केली. तसेच, हातभट्टीसाठी वापरले जाणारे तब्बल अडीच हजार लिटर रसायन, दारू गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित वसंत काईंगडे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे पिंपरीचेच आहेत. भट्टी ज्या ठिकाणी आहे तेथे जाण्यासाठीचा रस्ता चिखलाने भरला होता. घटनास्थळी जाताना अत्यंत सावधपणे जावे लागले. थोडा जरी आवाज झाला असता तर त्यांना पोलीस आल्याची खबर मिळाली असती.
साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे म्हणाले की, 'ही दारू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. स्वस्त दराने आणि गावपातळीवर सहज उपलब्ध होत असल्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. आम्ही कारवाई करून वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच, भट्टीला कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू आहे.' या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टीसाठी लागणार्या मालाचा पुरवठा करणारा फरार झाला आहे.