पुण्यातील ‘इंडिया’ ला पाेलिसांच्या नोटिसा
सीविक मिरर ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करण्यासाठी निषेध आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांविरुद्ध आंदोलन करण्यावर विरोधक ठाम आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उध्दव ठाकरे गट) या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चे, काळे झेंडे दाखवून कोणत्याही पक्षाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटिसा नेत्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, देशातील एक महत्त्वाचे राज्य जळत असताना पंतप्रधान एका खासगी संस्थेचा पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. मणिपूरमधील महिला भगिनींना आम्ही तुमच्यासोबत आहाेत, हा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द आंदोलन करून काळे झेंडे दाखवणारच आहोत. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली तरी आम्ही घाबरणार नाही.