टवाळांच्या माथी पोलिसांची लाठी
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शहरातील भोसरी परिसरातील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, ताथवडे येथील बालाजी लॉ-कॉलेज, काळेवाडी येथील एमएस कॉलेज, डुडुळगाव येथील राजमाता जिजाऊ कॉलेज, काळेवाडी येथील निर्मल बेथनी कॉलेज, चिंचवड येथील फत्तेचंद जैन कॉलेज या सहा कॉलेजच्या परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे.
या सहा कॉलेजच्या परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या २७ मुलांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळांमध्ये या परिसरात पोलिसांच्या दामिनी पथकाकडून कारवाई केली जात आहे. महिला पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. मात्र, या सहा कॉलेज परिसरातील टवाळखोरांचा वावर वाढल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनीदेखील कॉलेज आणि शाळा परिसरात साध्या वेशात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. बुलेट दुचाकींवर फटाक्यासारखा आवाज काढणे, विद्यार्थिनी आणि महिला पालकांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहने चालविण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांमधून हाणामारी होण्याच्या घटनादेखील यापूर्वी घडल्या आहेत.
याबाबत शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या, प्राचार्यांच्या पोलीस ठाणे स्तरावर बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातून कोणत्या ठिकाणी टवाळखोरांकडून त्रास होतो याची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यानंतर महिला पोलीस दुचाकीवरून गस्त घालत आहेत, पण त्यानंतरही काही समस्या उद्भवत असल्याने पोलीस ठाणे स्तरासह गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शाळा आणि महाविद्यालय परिसरातील काही व्यावसायिकांच्या भेटीदेखील पोलिसांनी घेतल्या असून, त्यांनी सामाजिक भान ठेवत या भागात घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. शाळा-कॉलेजमधील स्कूल बसची माहिती देखील पोलिसांनी संकलित केली आहे. बसमधून किती विद्यार्थिनी प्रवास करतात. त्यांना बसमधून कोठे सोडण्यात येते. तेथे त्यांचे पालक येत नसतील तर त्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना कराव्यात यासाठी पोलिसांनी बैठकीतून माहिती दिली आहे.
शहरातील बहुतांश सर्व शाळा-कॉलेजच्या आवारात दर्शनी भागात तक्रार पेटी लावण्यास सांगण्यात आले असून, महिला पोलिसांकडून या तक्रार पेटी उघडून गुप्त माहितीचे संकलन देखील केले जाणार आहे. विशेष म्हणजे अंतर्गत तक्रारींची माहिती देखील या तक्रार पेटीच्या माध्यमातून द्यावी, असे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले आहे. शाळांमध्ये सांकेतिक भाषांच्या माध्यमातून लहान विद्यार्थिनींना परिसरात होणाऱ्या छेडछाडीबाबत माहिती दिली जात आहे.