माथाडीच्या नावाखालील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये माथाडीच्या नावाखाली चालणारी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहर पोलीस सरसावले असून, आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बैठक घेतल्यानंतर आता तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत.
चाकण, भोसरी, पिंपरी-चिंचवड, तळेगाव एमआयडीसी भागातील कंपनी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच सर्व अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. तक्रारदार यांनी पुढे यावे, हवे तर नाव न उघड करता माहिती दिली तरी कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यात पोलिसांकडून देण्यात आले होते.
दरम्यान, माथाडी महामंडळाचे अधिकारी आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व सहायक पोलीस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तीन दिवसांपूर्वी पुन्हा बैठक घेऊन कारवाई आणि समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर गेल्या चार दिवसात आठ विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाकड परिसरातदेखील एका मॉलमध्ये ट्रकमधील साहित्य उतरविण्यासाठी खंडणी मागणाऱ्या तथाकथित माथाडी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण भागातील म्हाळुंगे पोलिसांनी तीन टोळ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. माथाडी बोर्डाकडून (महामंडळ) कामगारांना मिळणारा मोबदला काढून घेणाऱ्या लोकांवरदेखील गुन्हे दाखल झाले असून, माथाडी कामगारांनी आता पुढे येऊन तक्रार दिली आहे.
राज्यातून मोठ्या प्रमाणात कंपन्या अन्य राज्यात जात असल्याने या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरातून माथाडीच्या नावाखाली चालणाऱ्या गुन्हेगारीमुळे नव्याने कंपनी निघून जाऊ नये, अशा स्वरूपाचे आदेश शासनाने प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्तालय सुरू झाल्यावर इंडस्ट्रियल सेलची पोलिसांकडून स्थापना करण्यात आली होती. मात्र, कालांतराने हा सेल बंद करण्यात आला. आता खुद्द पोलीस आयुक्तच ॲक्शन मोडमध्ये आल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.