देहु-आळंदी पालखी सोहळ्यातील चोऱ्या रोखण्यासाठी वारकऱ्यांच्या वेशात पोलीस सहभागी झाले आणि चोऱ्या कमालीच्या घटल्या
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या गुन्ह्यांत मागील वर्षाच्या तुलनेत चक्क १४३ ने घट झाली आहे. गेल्या वर्षी दागिने चोरीचे १५० गुन्हे झाले होते. या वर्षी केवळ ७ गुन्हे घडल्याने दागिने चोरीचे गुन्हे १४३ ने कमी झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही पिंपरी-चिंचवडमधील पालखी सोहळ्यात गुन्हे शाखेचे पोलीस वारकऱ्यांच्या वेशात सामील झाल्याने चोरीच्या घटना लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या.
राज्यभरातून वारकरी चार दिवसांसाठी देहू आणि आळंदी भागात येत असतात. त्याचा गैरफायदा घेऊन दागिने चौरण्यासाठी काही रेकॉर्डवरील गुन्हेगार गर्दीत मिसळलेले असतात. देहू आणि आळंदी परिसर हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत येत आल्याने या भागासाठी विशेष काळजी घेतली जाते.
राज्य पोलीस दलाकडून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात येतो. स्थानिक पोलिसांनाही बंदोबस्तासाठी नेमताना मागील वर्षापासून विशेष काळजी घेतली जात आहे. आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी तसेच मागील वर्षाच्या तत्कालीन आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना वेषांतर करून बंदोबस्तासाठी तैनात करण्याचे नियोजन केले होते.
मागील वर्षी पालखी सोहळ्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेषांतर करून बंदोबस्त कुठे कुठे तैनात केला होता आणि नव्याने कुठे बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे याची चाचपणी गुन्हेशाखेच्या उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त सतीश माने यांनी केली होती. त्यामुळे यंदा सोनसाखळी चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात रेकॉर्ड असलेल्या आणि वारी सोहळ्यात गर्दीत मिसळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही महिला आणि पुरुषांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी महिलांना सायंकाळी साडे सहा नंतर सोडून देण्यात आले होते. काही पुरुषांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु, ठराविक समाजाच्या लोकांना डांबून ठेवले अशी ओरड झाल्याने या लोकांना सोडून देण्यात आले. परंतु, विशेष खबरदारी घेण्यात आल्याने शहरातील तसेच राज्यातील भाविकांच्या दागिन्यांची चोरी रोखता आली आहे.
१५० सोनसाखळी चोरी, ११८ आरोपी
गेल्या वर्षी देहू आणि आळंदीतून निघालेल्या पालखीबरोबर भाविकांच्या गर्दीत मिसळलेल्या गुन्हेगारांनी १५० जणांच्या गळ्यातील दागिने लंपास केले होते. गेल्या वर्षीही पोलिसांनी भाविकांच्या गर्दीत वारकऱ्यांच्या वेशात बंदोबस्त केल्याने ११८ आरोपींना अटक केली आणि चोरीचे दागिने हस्तगत करून ते भाविकांना परत केले होते. यासाठी वेषांतर केलेले पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले होते.
यंदा घडलेल्या ७ सोनसाखळी चोरीच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या मदतीने तपास सुरू आहे. मागील वर्षी पकडलेले अनेक आरोपी एकतर कारागृहात आहेत. तसेच त्यातील काहीजण जामिनावर बाहेर आले आहेत त्यांचा पालखी काळात नेमका ठावठिकाणा कुठे होता हे तांत्रिक विश्लेषण करून पडताळून पाहिले जात आहे. मागील वर्षी प्रमाणेच पुढील आठवड्याभरात या सात सोनसाखळी चोरीच्या घटना उघड होतील.
- स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.