पोलीस कॉलनीतून पोलिसाची दुचाकी चोरीस जाते तेव्हा...
सीविक मिरर ब्यूरो
विश्रांतवाडी पोलीस वसाहत येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या पोलिसांच्याच वसाहतीतील या निमित्ताने प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येरवडा पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले पोलीस नाईक सचिन शिंदे यांची होंडा यूनिकॉर्न (एमएच १२ एचएक्स ७५३३) ही दुचाकी काही दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरीला गेली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी वसाहतीतून चोरीला गेल्यामुळे पोलीस वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस वसाहत येथील रहिवाशांसोबत संपर्क साधला असता ‘‘सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांसह इतर अनेक प्रलंबित समस्या या ठिकाणी आहेत. वसाहतीची स्वच्छता, पथदिवे, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.
ड्रेनेज लाईनसाठी वर्षभरापूर्वी काम पूर्ण करूनदेखील अद्याप त्याची पूर्णपणे डागडुजी करण्यात आलेली नाही. अशा अनेक समस्या मागील कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे वसाहतीत राहात असलेल्या पोलीस कुटुंबातील महिलांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही तसेच आवश्यक माहिती देऊनदेखील आमच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. यापूर्वीही येथे घरफोडी, सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता दुचाकी चोरीच्या घटनेची भर पडली.’’दुचाकी चोरीस गेल्यामुळे विश्रांतवाडी पोलीस वसाहतीमधील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी वसाहतीतील पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.