Police Commissioner : पोलीस आयुक्त प्रथमच थेट नागरिकांशी ‘कनेक्ट’

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर विनयकुमार चौबे यांच्या रूपाने पाच वर्षांत प्रथमच पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी ट्विटरवरून थेट संवाद साधला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 6 May 2023
  • 03:18 am
पोलीस आयुक्त प्रथमच थेट नागरिकांशी ‘कनेक्ट’

पोलीस आयुक्त प्रथमच थेट नागरिकांशी ‘कनेक्ट’

उद्योगनगरीत स्वतंत्र आयुक्तालय झाल्यावर चौबेंच्या रुपाने प्रथमच ट्विटरवरून संवाद

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर विनयकुमार चौबे यांच्या रूपाने पाच वर्षांत प्रथमच पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी ट्विटरवरून थेट संवाद साधला.

शहराला आयआयटीयन पोलीस आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे लाभले आहेत. शहराच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले आहे. तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन पोलिसिंगसाठी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

यावेळी शहरातील वाहतुकीच्या समस्येसह गुन्हेगारी आणि अन्य विविध विषयांवर नागरिकांनी पोलीस आयुक्तांना मनमोकळपणाने प्रश्न विचारले. ‘‘विदेशातील पोलिसांकडून कोणती गोष्ट शिकून ती शहरात लागू करण्यासारखी आहे,’’ असा प्रश्न अमित आवारे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे आयुक्तांनी कौतुक केले. याच्या उत्तरात ते म्हणाले, ‘‘मी नेदरलँड येथील भारतीय दूतावासात काम करत असताना तिथे होणारा तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावी वाटला. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे पिंपरी-चिंचवड शहरात करण्याचा मानस आहे.”

पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. यात चारचाकी आणि स्कूल बसदेखील असतात, असे श्रीकांत यांनी सांगितले. त्यावर आयुक्त उत्तरले... ‘‘येथील नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना िदल्या आहेत. मागील काही दिवसात तीन हजार वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे.’’

वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभाग पूर्णतः अपयशी ठरला असल्याची तक्रार राकेश यांनी केली. त्यावर ‘‘हिंजवडी परिसरात अनेक संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. त्यांच्यासोबत पोलीसदेखील सर्वसमावेशकपणे काम करत आहेत,’’ असे आयुक्तांनी सांगितले. याचबरोबर योगेश जोशी यांनी हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘पीक अवर्स’मध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याचा सल्ला दिला. याची दखल घेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत.

वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून व्हीडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जावी, अशी मागणी सोलो ट्रॅव्हलर या ट्विटर खातेधारकाने केली. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली जात असून त्याबाबतचे व्हीडीओ ट्विटरवरदेखील पोस्ट केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले. चाकणमधील वाहतूक सुरळीत होत आहे. त्याबद्दल सुनील भोंग यांनी कौतुक केले. याचे श्रेय पोलीस आयुक्तांनी चाकण वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक मछिंद्र आदलिंग यांना दिले. तसेच फीडबॅकसाठी सुनील भोंग यांचे आभार मानले.

‘‘पोलिसांचा दंडात्मक कारवाईवर अधिक भर आहे. त्याबाबत काहीतरी करा,’’ अशी सूचना संदीप शिंदे यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी, “नियमभंग करणाऱ्यांना दंड… आणि वाहतूक नियमनासाठी कटिबद्ध…!” अशी प्रतिक्रिया दिली. मोठा आवाज करणारे सायलेन्सर जसे जप्त करता, तसेच फॅन्सी नंबर प्लेटदेखील जप्त करण्याची मागणी श्रीकांत चव्हाण यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी फोटो पोस्ट करत फॅन्सी नंबर प्लेटदेखील जप्त करत असल्याचे सांगितले.

‘‘बुलेटचे फटाके फोडत जाणाऱ्यांवर कारवाई करा. विशेषतः जे रात्री १० नंतर फोडतात. त्यांना तर चांगलाच प्रसाद द्या,’’ अशी मागणी एन. के. यांनी केली. त्यावर आयुक्त म्हणाले, “कारवाई जोरात चालू आहे. प्रसाद नाही, पण दंड ठोठावला जात आहे. या वर्षी ३५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.”

प्रतीक नाईक यांनी प्रत्येक आठवड्याला नागरिकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कल्पना आणि प्रश्न पोलिसांपुढे मांडता येतील, असेही त्यांनी सुचवले. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या ट्विटर आणि पिंपरी–चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. संदीप भामरे यांनी बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होत असेल तर कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारले. त्यावर आयुक्तांनी ११२ क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती केली.

शहराला प्रथमच आयआयटीची पार्श्वभूमी असलेले पोलीस आयुक्त मिळाले आहेत. शहरातील पोलिसिंगच्या बाबतीत काही बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतीक कारंजे यांनी सुचवले. त्यावर आयुक्तांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर औद्योगिक वसाहती आणि आयटीनगरी असलेल्या शहरासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली.

शहरातील कोयता गॅंग आणि गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी विशाल दवणे यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी थेट आकडे सादर करत सांगितले की, ‘‘मागील चार महिन्यांत एकूण ५९ शस्त्रे आणि २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. भविष्यातही अशीच कडक कारवाई सुरू राहील.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story