पीएमपीएमएल बस चालकाची आत्महत्या
पुणे महानगर परिवहन लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बस चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विलास बुले (३५) असे आत्महत्या केलेल्या मृत चालकाचे नाव आहे. मात्र, कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठांनी मानसिक छळ केल्यामुळे विलास बुलेंनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
विलास बुले हे खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील रहिवासी आहेत. गेल्या ८ महिन्यांपुर्वीच त्यांनी पीएमपीएमएल बसवर कंत्राटी कामगार म्हणून काम सुरू केले होते. मात्र, शुक्रवारी राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत विलास यांचा मृतदेह आढळून आला.
विलास यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत विलास यांना दरमहा योग्य पगार मिळत नव्हता. तसेच कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठांकडून मानसिक छळ होत होता, असा आरोपही केला आहे.