पीएमपीच्या स्मार्ट बस थांब्यांची अडगळ

शहरात विविध ठिकाणी पीएमपीचे स्मार्ट बस थांबे हे आता अडगळ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधींचा अट्टाहास आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) चुकीच्या व्यवस्थापनामुळे शहरात विनाकारण अनेक बस थांबे असल्याचे दिसते. गरज नसताना एकाच ठिकाणी दोन थांबे देणे, मार्ग बंद झालेला असताना थांबे न हलवणे आणि मार्ग सुरू होण्यापूर्वीच थांबा उभारणे असे गैरकारभाराचे अनेक नमुने 'सीविक मिरर'च्या पाहणीत समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:48 am
पीएमपीच्या स्मार्ट  बस थांब्यांची अडगळ

पीएमपीच्या स्मार्ट बस थांब्यांची अडगळ

पटवर्धनबाग, गणंजय सोसायटी, वनाज, विश्रांतवाडी परिसरातील थांबे शोभेपुरतेच; लोकप्रतिनिधींनी उभारले म्हणून अनेक थांबे वापराशिवाय धूळ खात पडून

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरात विविध ठिकाणी पीएमपीचे स्मार्ट बस थांबे हे आता अडगळ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधींचा अट्टाहास आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) चुकीच्या व्यवस्थापनामुळे शहरात विनाकारण अनेक बस थांबे असल्याचे दिसते. गरज नसताना एकाच ठिकाणी दोन थांबे देणे, मार्ग बंद झालेला असताना थांबे न हलवणे आणि मार्ग सुरू होण्यापूर्वीच थांबा उभारणे असे गैरकारभाराचे अनेक नमुने 'सीविक मिरर'च्या पाहणीत समोर आले आहे.  

काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने स्मार्ट बस थांबे उभारण्याची लाट शहरात आली होती. सीसीटीव्ही, फ्री वायफाय, प्रथमोपचार पेटी, बसथांब्याची इलेक्ट्रॉनिक बोर्डवर माहिती अशा अत्याधुनिक सोयींची स्वप्ने दाखवत स्मार्ट बस थांबे सुरू करण्यात आले. एका नगरसेवकाचे पाहून दुसऱ्या नगरसेवकानेही आपल्या भागात असेच थांबे उभारले. काहींनी आकर्षक स्टीलचे बस थांबे उभारले. मात्र, या स्मार्ट थांब्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. आज पीएमपीच्या ताब्यातील अनेक थांबे अडगळ बनले आहेत. यातील बरेचसे नगरसेवकांच्या विकास निधीतून उभारल्याचे सांगितले जात आहे. बसथांबे उभारताना त्याची गरज आहे का, मार्ग बदलल्यानंतर आवश्यक ठिकाणी तो थांबा हलवणे अशा साध्या गोष्टी देखील केल्या गेलेल्या नाहीत. 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने शहरातील विविध ठिकाणच्या वापरात नसलेल्या थांब्यांची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. 

कोथरूडमधील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे म्हणाले, पटवर्धनबाग येथील पीएमपी बसचा मार्गच बंद झाला आहे. त्यानंतरही येथील थांबे इतरत्र हलवलेले नाहीत. गणंजय सोसायटीजवळून पीएमपीची बस जात नाही. त्यामुळे येथील थांबाही निरूपयोगी ठरला आहे. वनाज कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी बसथांबा आहे. मेट्रोच्या कामामुळे येथे आता बस थांबतच नाही. वनाजजवळ थांबणारी बस आता कॉसमॉस बँकेच्या थांब्यावर जाते. त्यामुळे हा थांबाही बिनकामाचा ठरला आहे. स्थानिक नगरसेवकाच्या निधीतून उभारण्यात आला म्हणून तो बस थांबा वापराविना धूळ खात पडू देणे चुकीचे आहे. नागरिकांना त्याचा उपयोग होणे महत्त्वाचे आहे. वापराविना पडून असलेले बस थांबे गरज आहे अशा ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचे ऊन-पावसापासून संरक्षण होण्यास मदत होईल, असेही काळेंनी सांगितले.

विश्रांतवाडी येथील रहिवासी अरुण सोनवणे म्हणाले, विश्रांतवाडीतील ५०९ चौक ते सावंत पेट्रोलपंपाच्या मार्गावर किमान तीन ते चार ठिकाणी पीएमपीचे दोन-दोन बस थांबे आहेत. त्यांची काही गरज नाही. अतिरिक्त थांबे वापरलेच जात नाहीत. तसेच ५०९ चौकातून बस विश्रांतवाडीकडे वळते तिथे एक थांबा आहे. मात्र, त्या थांब्यावर बस कधीच थांबत नाही. मग, तिथे थांबा का उभारला, यातील बहुतांश बस थांबे नगरसेवकांनी उभारलेले आहेत. पीएमपीएमएल गरज नसताना आणि गरज नसलेल्या ठिकाणी बस थांबे का उभारू देते,  हा सार्वजनिक निधीचा गैरवापर नाही का, असे प्रश्नही सोनावणे यांनी उपस्थित केले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story