पीएमपीचे ‘आदर्श’ घटले

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दीड महिन्यांपूर्वी ३० आदर्शित मार्ग निश्चित करून त्यावर सेवा देण्यास सुरुवात केली होती, पण आता प्रशासनानेच हे मार्ग निम्म्यावर आणले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Mar 2023
  • 12:05 am
पीएमपीचे ‘आदर्श’ घटले

पीएमपीचे ‘आदर्श’ घटले

दीड महिन्यांपूर्वी आदर्शित केलेल्या ३० मार्गांची संख्या निम्म्यावर

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दीड महिन्यांपूर्वी ३० आदर्शित मार्ग निश्चित करून त्यावर सेवा देण्यास सुरुवात केली होती, पण आता प्रशासनानेच हे मार्ग निम्म्यावर आणले आहेत.

प्रत्येक आगारामध्ये एक याप्रमाणे १५ मार्गांवर आदर्शवत सेवा दिली जात असून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. या मार्गांवर अधिक चांगल्याप्रकारे सेवा देता यावी, यासाठी मार्ग कमी केल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी आदर्शवत मार्ग ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार सुरुवातीला ३० मार्ग निश्चित झाले होते. प्रत्येक आगाराचे दोन मार्ग निश्चित झाले होते, पण दीड महिन्यांतच १५ मार्ग कमी करून प्रत्येक आगाराकडे एक मार्ग ठेवण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मार्गांवर आदर्श सेवा देताना कसरत करावी लागणार होती. तेवढे मनुष्यबळ तसेच तातडीने पर्यायी बसची व्यवस्था करणे कठीण झाले असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात एकच मार्ग घेण्यात आला आहे.

सध्या महामंडळाकडील १५ आगारांमार्फत ३८९ मार्गांवर सुमारे १,७५० बस संचलनात असतात. त्यापैकी १५ मार्ग आदर्शित मार्ग ठरविण्यात आले आहेत. या मार्गांवर १०९ बसमार्फत दररोज १,२६४ फेऱ्या होतात. या मार्गावरील सकाळ आणि दुपारच्या सत्रात पूर्ण क्षमतेने बस चालू ठेवण्यात येणार आहेत. सर्व फेऱ्या नियोजित वेळेतच आणि निर्धारित वारंवारितेने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित चालक तसेच वाहकांना देण्यात आल्या आहेत.

मार्गावर दोन्ही सत्रांमध्ये चालक आणि वाहक तसेच त्यांची बस निश्चित राहणार आहे. या मार्गावरील चालक, वाहक सेवकांचा प्रवाशांशी सौजन्यपूर्ण आणि नम्र व्यवहार अपेक्षित आहे. याबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व १५ मार्गांवर बसचे ब्रेकडाऊन टाळण्यासाठी सुस्थितीतील बस सोडल्या जात आहेत. या बस आतून तसेच बाहेरून  स्वच्छ धुवूनच मार्गावर सोडण्यात येत आहेत. चालक आणि वाहक यांनी बॅजसह संपूर्ण स्वच्छ गणवेश परिधान करूनच संचलन करणे आवश्यक आहे.

याविषयी पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले, ‘‘संबंधित मार्गांवर प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ३० मार्ग निश्चित केले होते. पण त्याची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. आता प्रत्येक आगाराला एक मार्ग दिला असून त्यानुसार बस मार्गावर धावत आहेत. याबाबत दररोज पाठपुरावा केला जात आहे. त्याबाबत सर्व आगारप्रमुखांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासी संख्या वाढविणे, वारंवारिता टिकविणे यावर अधिक भर दिला जात आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story