दगड, फांद्या लावणे आता पुरे

खोदकामांदरम्यान अपुऱ्या बॅरिकेड्समुळे दगड, झाडाच्या फांद्या लावून वेळ मारून नेली जात असल्याचा पुणे महापालिकेचा लज्जास्पद प्रकार ‘सीविक मिरर’ने अनेकदा उजेडात आणला होता. शास्त्रीय बॅरिकेड्सअभावी पालिकेची दुर्दशा वारंवार चव्हाट्यावर येण्याची नामुष्की टाळण्यासाठी पथ विभागाने आता ७०० आधुनिक बॅरिकेड्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:37 pm
दगड, फांद्या लावणे आता पुरे

दगड, फांद्या लावणे आता पुरे

महापालिका करणार ७०० आधुनिक बॅरिकेड्स खरेदी, खोदकामाच्या स्वरुपानुसार सात प्रकारचे बॅरिकेड्स घेणार

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

खोदकामांदरम्यान अपुऱ्या बॅरिकेड्समुळे दगड, झाडाच्या फांद्या लावून वेळ मारून नेली जात असल्याचा पुणे महापालिकेचा लज्जास्पद प्रकार ‘सीविक मिरर’ने अनेकदा उजेडात आणला होता. शास्त्रीय  बॅरिकेड्सअभावी पालिकेची दुर्दशा वारंवार चव्हाट्यावर येण्याची नामुष्की टाळण्यासाठी पथ विभागाने आता ७०० आधुनिक बॅरिकेड्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामाच्या स्वरूपानुसार सात प्रकारचे बॅरिकेड्स खरेदी केले जाणार आहेत. यामध्ये महापालिकेला कोणत्या प्रकारचे खोदकाम करायचे आहे, त्यावरून तेथे स्‍टँड अलोन, चौकोनी (स्केअर), गोल (सर्कल), लायनर, ड्रम, फोल्डिंग व मास बॅरिकेड्सचा वापर करता येईल. पथ विभागाने प्रथमच अशी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे महापालिकेतर्फे शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाणी पुरवठा, मलःनिसारण, विद्युत यांसह इतर कारणांमुळे सतत खोदकाम सुरू असते. अनेक वेळा ड्रेनेजचे झाकण तुटल्याने भर रस्त्यात खड्डा पडलेला असतो. अशा वेळी सुरक्षेसाठी या खड्ड्याच्या भोवती बॅरिकेड्सचे व्यवस्थित कडे करणे आवश्‍यक असते. सध्या एखादे-दुसरे बॅरिकेड्स लावलेले असते. अनेकदा तात्पुरती उपाययोजना केली जाते. पण, ती पुरेशी नसते. यासाठी पथ विभागाने बॅरिकेड्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा हॉटमिक्स प्लांट आणि सारसबाग कोठी येथे हे बॅरिकेड्स ठेवले जाणार आहेत. ‘‘हे बॅरिकेड्स कोणत्या कामासाठी वापरले जाणार? त्याचे ठिकाण काय? किती दिवस लागणार, याची नोंद या ठिकाणी ठेवली जाणार आहे. अशाप्रकारे हे बॅरिकेड्स हरवू नये, यासाठी काळजी घेतली जाईल,’’ असे  पथविभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

भटके, भंगारवाले आणि भिकारी लोकांनी  बॅरिकेड्स चोरू नये, यासाठीही काळजी घेतली जाईल.  शहरात गेल्या काही वर्षांत लोखंडी तसेच प्लॅस्टिक आणि फायबरच्या बॅरिकेड्सची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेकदा भंगाराच्या दुकानाबाहेर अशा बॅरेकेड्सचा खच पडलेला असला तरी पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी त्याची खरेदी करणाऱ्या लोकांवर कारवाई करताना दिसत नाहीत.

दांडगे म्हणाले, ‘‘पथ विभागाने सात कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर शहरातील रस्त्यांची विभागणी केली आहे. त्यानुसार सात विभागांसाठी ७०० बॅरिकेड्सची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये सात प्रकारचे प्रकारचे प्रत्येकी १०० बॅरिकेड्स आहेत. सात विभागाला सात प्रकारचे प्रत्येकी २० बॅरिकेड्स दिले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या सर्व भागांत त्याचा योग्य पद्धतीने उपयोग होऊ शकेल.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story