बैलगाडा घाटात दिले पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
वर्चस्वाच्या लढाईतून झालेल्या चिखली येथील सोन्या तापकीर खूनप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, यातील मुख्य सूत्रधाराने अल्पवयीन आरोपींना बैलगाडा घाटात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यक्तीचे व्हॉट्स ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह करून चिखलीतील प्रेमिकेच्या संपर्कात असल्याचे गुंडाविरोधी पथकाने हेरले. त्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करत नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य सूत्रधाराला तीन साथीदारांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.
करण रतन रोकडे (वय २५, रा. चिखली), ऋत्विक ऊर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकू दिनेश कुमार (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे असून एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२२ मे रोजी चिखली येथे दोघांनी सोन्या तापकीर याचा गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना पकडले. मात्र, मुख्य सूत्रधार करण रोकडे हा फरारच होता. त्याच्या मागावर पोलीस पथके होती. गुंडाविरोधी पथकाला आरोपींचा ठावठिकाणा लागला. मुख्य आरोपी करण रोकडे, त्याचा लहान भाऊ आणि अन्य दोघेजण भारत-नेपाळ सीमेवरील एका गावात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मथुरा शहरापासून ७५० किलोमीटर दूर असलेल्या नेपाळ सीमेवरील मऊ जिल्ह्यातील मधुबन गावात सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पहिल्या मजल्यावरून उड्या मारून शेतात पळ काढला. भर पावसात गुंडा विरोधी पथकाने शेतात पाठलाग करून चौघांना पकडले.
आरोपी मथुरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथे पुजारी आणि गाइड असणाऱ्या एकाचा मोबाईल आरोपी करणने वापरायला घेतला होता. त्यामुळे गुंडाविरोधी पथक मथुरा येथे दाखल झाले. परंतु आरोपी तेथे नव्हते. तसेच पुजाऱ्याचा मोबाईल त्याच्याजवळच होता. त्यामुळे पोलिसांचा तपास जागेवर थांबला. त्यानंतर त्याच्या मोबाईलमधील व्हाट्स ॲप स्वतःच्या मोबाईल मध्ये ॲक्टिव्ह करून घेतले होते. काही दिवस येथे राहिल्यानंतर आरोपी मधुबन गावात गेले होते. करण हा व्हाट्स ॲपद्वारे चार लोकांच्या सातत्याने संपर्कात होता. त्यातील एक नंबर हा करणच्या चिखली येथील प्रेयसीचा होता. त्यामुळे गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी प्रेयसीसह त्या तीन मोबाईल क्रमांकांवर लक्ष केंद्रित केले.
मधुबन येथे गेल्यावर आरोपींचा ठाव ठिकाणा सहायक निरीक्षक हरीश माने यांना समजला. पोलीस त्या ठिकाणी पोहोचताच आरोपींनी अर्धनग्न अवस्थेतच थेट पहिल्या मजल्यावरून भर पावसात शेतात खाली उड्या मारल्या आणि त्यातून पळून जाण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करीत चौघांना पकडले.
अटक टाळण्यासाठी आरोपी लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश येथे पळून जात होते. आरोपी करण रोकडे याच्यावर निगडी, देहूरोड, चिंचवड, चिखली, रावेत, शिक्रापूर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी मुंग्या रोकडे याच्यावर निगडी, चिखली, चाकण, निगडी, लोणीकंद पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी रिंकू कुमार याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. चिखली पोलीस आणि गुंडाविरोधी पथकाने आतापर्यंत या प्रकरणी ११ जणांना अटक केली असून येत्या काळात अन्य आरोपींची धरपकड होण्याची शक्यता आहे. गुन्हेगाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची देखील धरपकड करण्याचे आदेश आयुक्त चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांना दिले होते.
गुंडाविरोधी पथकाचे हरीश माने, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी या कारवाईत भाग घेतला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.