संग्रहित छायाचित्र
हिवाळा सुरु झाल्याने थंडी वाढू लागली आहे. शहरावर दाट धुक्याची चादर पसरली जात आहे. त्यातच शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवडवासियांमध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांत वाढ झाली आहे.
भोसरी, थेरगाव, पिंपरीसारख्या भागात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक २००-२५० पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत गेल्याने श्वासोच्छवास, फुफ्फुसांचे विकार असलेल्या रुग्णांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणादेखील फेल ठरु लागल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण वाढल्याचे पाहायला मिळाले होते. फटाक्यांच्या धुरापासून रुग्णांना त्रास झाल्याचे समोर आले होते. परंतु, त्यानंतर वातावरणातील बदल, वाढणारी थंडी आणि अन्य वायू प्रदूषणामुळे पुन्हा शहरातील प्रदुषणाची पातळी वाढली आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५० ते ३०० च्या जवळपास नोंदवला गेला. यामध्ये भोसरीतील खंडेवस्ती येथे २७९, थेरगाव परिसरात ३०६, पिंपरी कॉलनी परिसरात २३९, तर वाकडमध्ये १५३ असल्याचे दिसून आले.
खराब श्रेणीत पोहोचलेली शहराची हवा शहरवासियांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. या दिवसांमध्ये श्वसनविकाराच्या रुग्णांनी योग्य काळजी घ्यावी. तसेच, लक्षणे वाढताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे. हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
श्वसनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ
महापालिका वैद्यकीय विभागाकडील सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून शहरात प्रदूषणामुळे श्वसनाच्या रुग्णसंख्येत सतत भर पडत असल्याचे दिसून येते. २०२०-२१ या वर्षात अशा विकारांचे फक्त ३६१ रुग्ण होते. दुसऱ्याच वर्षी २०२१-२२ तीनपट वाढ होऊन १,३०१, तर २०२२-२३ मध्ये ही रुग्णसंख्या २,३२१ पर्यंत पोहोचली. सतत वाढणाऱ्या प्रदूषामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवा प्रदूषणवाढीमुळे शहरात श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांना श्वासोच्छवास, फुफ्फूसांचे विकार होत आहेत. शहरवासियांना एकप्रकारे विषारी ऑक्सिजन घ्यावा लागत आहे. हे चित्र शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकावरून पाहायला मिळत आहे. प्रशासन प्रदूषण कमी करण्यात अपयशी ठरत आहे.
- प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी
थंडी आणि अन्य वायुप्रदूषणामुळे श्वसन विकाराचा धोका वाढतो. दम्याच्या रुग्णांसह या दिवसांमध्ये सामान्य नागरिकांना काळजी घ्यावी. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. श्वसनाशी संबधित आजारांचा प्रतिकार करण्यासाठी योग्य आहाराचे संतुलन ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. शिवाजी ढगे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
हवा गुणवत्ता निर्देशांक - प्रकार
०-५० - चांगला
५१-१०० - समाधानकारक
१०१-२०० - मध्यम प्रदूषित
२०१-३०० - खराब
३०१-४०० - अत्यंत खराब
४०१ - गंभीर