पाऊस गेला अन् खड्डे बुजवण्याचा देखावाही

महापालिका हद्दीतील अनेक भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तसेच काम राहिले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर स्थापत्य विभागाचे पथक गायब झाले. आठ प्रभागात ३२ पथकांद्वारे एक दिवसच खड्डे बुजवण्यात आले.

Rain ,Pot hole, Driver, Pothole repair, municipal road maintenance, construction department, pothole filling, internal road work

स्थापत्य विभागाचे पथक गायब, रस्त्यांवरील खड्डे तसेच, वाहनचालकांची कसरत पुन्हा सुरूच

महापालिका हद्दीतील अनेक भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तसेच काम राहिले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर स्थापत्य विभागाचे पथक गायब झाले. आठ प्रभागात ३२ पथकांद्वारे एक दिवसच खड्डे बुजवण्यात आले. मात्र, अनेक अंतर्गत रस्त्यासह काही भागात रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम प्रलंबित राहिले होते. त्यामुळे वाहनचालकांची कसरत सुरूच असून पावसाने उघडीप घेतल्यानंतर स्थापत्य विभागाचे खड्डे बुजवणारे कामगारही सुट्टीवर गेले आहेत का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे पालिकेने खड्डे बुजवण्याचा केवळ देखावा केला असल्याची चर्चा रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली होती. शहरात रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. मात्र, काही दिवस पावसाने उघडीप देऊनही महापालिका खड्डे बुजवत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय व स्थापत्य प्रकल्प विभागाला शहरातील विविध रस्त्यांवर तब्बल २९४६ खड्डे आढळून आले हाेते. त्यापैकी २३७८ बुजविले होते. त्यापैकी केवळ ५६८ खड्डे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक भागात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर आणखी खड्डे दिसून येत आहेत. यंदा जूनअखेर पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २९४६ खड्डे आढळले हाेते.

त्यापैकी १६३९ खड्डे १३ जुलैपर्यंत आढळून आले हाेते. त्यानंतर २१ ऑगस्टअखेर १३०७ खड्डे आढळून आले आहेत. डांबर आणि काेल्ड मिक्स, खडी, पेव्हिंग ब्लाॅक, सिमेंट काँक्रिट ते पूर्णतः बुजविले आहेत. शहरातील केवळ ५६८ खड्डे बुजविण्याचे बाकी आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येतात.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगवी पूरस्थिती पाहणी दौऱ्यानंतर महापालिकेने ३२ पथकाद्वारे एकाच दिवसात खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे पथक गायब झाले. रस्त्यावरचे खड्डे देखील बुजवण्याचे राहून गेले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  

वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाहन खड्ड्यात आदळून चालकाला तसेच वाहनाला दणका बसत आहे. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे.

पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे मुरुम, खडी आणि सिमेंट-काँक्रिटने बुजवले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहेत.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात अपयशी ठरले आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावे. रस्त्यावर तात्पुरती डागडुजी केल्याने रस्त्यांवर खडी पसरली आहे.

- हितेश रहांगडाले, नागरिक, रावेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest