पिंपरी-चिंचवड : मुलींच्या शिक्षणाला पालिकेची आडकाठी
राज्यात एकीकडे मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुलींच्या शिक्षणात आडकाठी घातली आहे. जाचक अटी व शर्थी घालून मोफत बस पास सुविधा बंद केली आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा महापालिकेने केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराने एकत्रित येत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केलेली आहे. त्यानुसार पीएमपीएमएलच्या बस दोन्ही शहरासह हद्दीबाहेरही ये - जा करतात. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणारी संस्था एकत्रित असतानादेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीचा मुद्दा उपस्थित विद्यार्थ्यांच्या बस पास सुविधेत आडकाठी घातली आहे.
महापालिका शाळांसह शहरातील विविध ठिकाणच्या खासगी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर काॅलेजमध्ये हजारो मुले - मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वर्षाला हजारो रुपये मोजावे लागत आहेत. पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. त्याउलट पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच पीएमपीएमएल बसने प्रवास करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने १० जून २०२४ रोजी पीएमपीएमएलला दिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना बस पास देण्याकरिता काही अटी व शर्तींचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील मनपाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, तसेच खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील. महापालिका हद्दीबाहेरील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पास दिल्यास त्यांचे बिल महापालिका अदा करणार नाही, असे म्हटले आहे.
महापालिका विद्यार्थ्यांच्या शिक्षणात जाचक अटी व शर्थी टाकून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवू लागल्याचे दिसत आहे. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासच्या सवलतीबाबत भेदभाव करताना दिसत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना पास हवा असेल तर विद्यार्थ्यांच्या प्रवाशाचे अंतर घर ते शाळा दोन किमी पेक्षा जास्त असावे. मागील शैक्षणिक वर्षाची हजेरी किमान ७५ टक्के असणे आवश्यक आहे. त्याने मागील शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी महापालिका हद्दीत निवास करत आहेत व महापालिका हद्दीत शिक्षण घेत आहेत. अशाच पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना मोफत बस पास सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या जाचक अटी व शर्थीने विद्यार्थ्यांना मोफत बस मिळणे बंद झाले असून अनेक विद्यार्थ्यांना पदरमोड करावी लागत आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना खरोखर बस पासची आवश्यकता आहे याची खातरजमा करून अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. महापालिकेने दिलेल्या अटी व शर्थीची पूर्तता न करता विद्यार्थ्यांना मोफत बस पास वाटप केल्यास व तपासणीदरम्यान असे आढळल्यास त्यांची रक्कम पीएमपीएमएल यांना मनपाकडून अदा करण्यात येणार नाही.
- प्रदीप जांभळे - पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्यास शहरातील हजारो सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळेल. शहरातील वाहतुकीवर ताण कमी होऊ शकेल. अनेक विद्यार्थी रिक्षा, स्कूल बस यांसारख्या वाहनांमधून रोज शाळेत ये-जा करत असतात. त्यामुळे शाळांच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी निदर्शनास येते. त्यामुळे महापालिका व खासगी शाळांमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे शैक्षणिक मोफत बस पास उपलब्ध करून द्यावेत.
- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड शहर