Pimpri-Chinchwad : महाविकास आघाडीत बिघाडी, उबाठा गटाची ससेहोलपट

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) गटाला सुटले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी तत्काळ बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) गटाच्या उमेदवाराचे काम न करण्याचा ठराव केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 29 Oct 2024
  • 12:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघापैकी शिवसेनेला एकही जागा नाही, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवारांचे काम न करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) गटाला सुटले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी तत्काळ बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) गटाच्या उमेदवाराचे काम न करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून शिवसेनेच्या ठाकरे गटाची ससेहोलपट होऊ लागली आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा डाव आहे, असा आरोप ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी केला आहे.

पिंपरी- चिंचवडमधील आकुर्डी येथील सेना भवन येथे ही बैठक पार पडली. महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पिंपरी-चिंचवड शहरात एकही जागा सुटलेली नाही. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये जागा न मिळाल्याने संतापलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम न करण्याचा ठराव रविवारी (दि.२७) पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना भवनात मंजूर केला आहे. नुकतीच शरद पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. 

यादीत पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी सुलक्षणा शीलवंत- धर यांचे नाव जाहीर करण्यात आले. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह माजी आमदार गौतम चाबुकस्वार इच्छुक होते. याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली होती, तर भोसरीतून अजित गव्हाणे आणि चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. अखेर महाविकास आघाडीतील जागावाटप झाल्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या पक्षाला गेला. 

नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आकुर्डीत सेना भवन या ठिकाणी बैठक घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. महाविकास आघाडीचा उमेदवार दिला असला तरी आम्हीदेखील या मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट शिवसैनिकांनी सांगितले. 

तिन्ही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अपक्ष उमेदवारी घेऊन बंडखोरी करणार आहेत. इच्छुक निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा पेच पक्षश्रेष्ठी सोडवणार का? हे पाहावे लागणार आहे.

आम्ही महाविकास आघाडीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदारसंघ मागत होतो. या तिन्ही मतदारसंघात आमची मोठी ताकद आहे. मात्र आमची ताकद असताना देखील आम्हाला एकही जागा पिंपरी चिंचवड शहरात मिळाली नाही. याला कारणीभूत फक्त शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. - सचिन भोसले, उबाठा शिवसेना

Share this story