संग्रहित छायाचित्र
कासारवाडी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाशिक फाट्यावर वळसा घालून पिंपळे गुरव, सांगवीकडे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महापालिकेकडून कासारवाडी शंकर मंदिर रस्ता आणि भुयारी मार्ग या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम कित्येक दिवसांपासून सुरू आहे. दोन टप्प्यात रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.
स्थापत्य विभागाकडून रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून कामाच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्ष जागेवर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसामुळे मागील तीन महिन्यांपासून हे काम थांबविण्यात आले होते. कासारवाडी शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंत हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण केला जात आहे. रस्त्याच्या कामाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने रहदारीस मदत होईल असे सांगितले होते. पण, रस्त्याचे काम कित्येक दिवसांपासून सुरू असल्याने वाहनचालकांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यामुळे जुनी सांगवी-नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपरी, भोसरीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी जवळचा मार्ग म्हणून मागच्या अनेक वर्षांपासून नागरिक रहदारीसाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, जुना अरुंद डांबरी रस्ता व पावसाळ्यात शंकर मंदिर परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकारामुळे अनेकदा येथून रहदारीसाठी कसरत करावी लागत होती. भुयारी मार्ग व रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागणार आहे.
असे आहे रस्त्याचे काम
शंकरवाडी ते पिंपळे गुरव सृष्टी चौक पुलापर्यंत हा रस्ता जोडला जात आहे. साधारण २३ कोटी ३९ लाख ९७ हजार रुपये या कामाचा खर्च आहे. कामाची मुदत नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. काही ठिकाणी बारा मीटर व अठरा मीटर असे रस्त्याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. बारा मीटर रस्त्याचे एकूण अंतर सातशे मीटर असून अठरा मीटर रस्त्याचे एकूण अंतर ८६० मीटर आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला तीनशे ते चारशे मीटर व्यासाच्या सेवा वाहिन्या, पावसाळी पाणी वाहिन्या जलनिस्सारण वाहिन्या, ड्रेनेज लाइन टाकण्यात आले आहेत. शंकरवाडी अंडरपास पर्यंतचा तीनशे मीटर लांबीचा रस्ता उजव्या बाजूस पूर्ण झाला आहे, तर डाव्या बाजूचे किरकोळ काम दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला सायकल ट्रॅक ग्रीनरी, पदपथ, पथदिवे करण्यात येत आहेत.
या रस्त्याचे काही टप्प्यातील सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि किरकोळ कामे सुरू आहेत. कामाच्या मुदतीत या रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्ण केले जाईल. या रस्त्यावर एका बाजूने रहदारी सुरू आहे. मुदतीआधी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. - सुनील दांगडे, उप अभियंता स्थापत्य विभाग