संग्रहित छायाचित्र
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटली होती. विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक विभागाने घराजवळ मतदान केंद्र बनविण्यात येत आहे, तर काही मतदान केंद्र चक्क हाऊसिंग सोसायटीत तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास निवडणूक विभागाने केला आहे.
मे महिन्यात झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच, निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मात्र, केवळ ५४.८७ टक्के मतदान झाले. मतदार यादीत नाव नसणे, दूर अंतरावरील केंद्रात नावे असणे, नाव न सापडणे, घरी व्होटर स्लिप न मिळणे आदी कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घटली होती. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दिवाळीच्या सुटीत नागरिक सहकुटुंब गावी जातात. तसेच, मतदानाच्या सुटीच्या दिवशी सहलीचा आनंद घेतात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता असते. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महापालिका प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृतीवर भर दिला आहे. तसेच, घराजवळ मतदान केंद्र निश्चित केली आहेत.
महापालिका व खासगी शाळांसह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. सोसायटीच्या क्लब हाऊस व रिकाम्या गाळ्यात तब्बल २६ केंद्र तयार केले जाणार आहेत. तेथील एका मतदान केंद्रात १ ते १ हजार ४०० मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोरवाडी, पिंपरी येथील त्रिवेणी हाऊसिंग सोसायटीत २ मतदान केंद्र असणार आहेत. तेथीलच रिवरडेल हाऊसिंग सोसायटीत २ केंद्र असतील. कासारवाडी येथील मंत्री इटर्निटी हाऊसिंग सोसायटीत २ मतदान केंद्र असणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ९ हाऊसिंग सोसायटीत एकूण १३ मतदान केंद्र असणार आहेत. थेरगावात स्विस काउंटी सोसायटीत २, थेरगावात गंगा आशियाना मिडास सोसायटी १, विजयनगर, काळेवाडीतील सोनिगरा विहार सोसायटीत १, पिंपळे सौदागर येथील राजवीर पॅलेसमधील फेज एकमध्ये १, तेथीलच सिद्धिविनायक जिंजर सोसायटीत १, पिंपळे निलख येथील निसर्ग आनंद सोसायटीत ३ केंद्र असणार आहेत. कस्पटेवस्ती, वाकड येथील विंडवर्ड सोसायटीत १ आणि रहाटणीतील फाईव्ह गार्डन सोसायटी २ केंद्र आहेत. रावेतमधील सेलेस्टियल सिटी सोसायटीत १ केंद्र आहे.
भोसरीत घरकुलात करता येणार मतदान
भोसरी विधानसभेत चिखली घरकुलातील मधुमिलन सोसायटीतील बिल्डिंग क्रमांक ३४ येथे ३ मतदान केंद्र आहेत. संत नगर, बोर्हाडेवाडी येथील केंद्रीय विहार सोसायटीत ३ आणि बोर्हाडेवाडीतील होयाज हाऊसिंग सोसायटीत १ मतदान केंद्र आहे. असे एकूण ७ मतदान केंद्र सोसायटीच्या परिसरात आहेत.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी विविध सुलभ अॅप व प्रणाली सुरू करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या या लिंकवर नाव शोधता येते. त्यात नाव व ओळखपत्र क्रमांक टाकून मतदार केंद्र शोधता येते.
केंद्रांवर व्हीलचेअर, पाळणाघर, वैद्यकीय सुविधा
मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून निवडणूक विभाग विविध उपाययोजना करीत आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प तसेच, ज्येष्ठ मतदार, दिव्यांग व रुग्णांसाठी व्हीलचेअर सुविधा देण्यात येणार आहे. मंडप, महिला मतदार, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, बालकांसाठी पाळणाघर, वैद्यकीय सुविधा आदी अधिकच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य चौक, उद्यान, क्रीडांगणे, महाविद्यालये, हाऊसिंग सोसायट्या, मॉल, सिनेमागृह, जीम, व्यावसायिक आस्थापना, कंपन्या, महिला बचत गट, झोपडपट्टी परिसर, ज्येष्ठ नागरिक संघ, भाजी मंडई, मजूर अड्डा, रुग्णालये व औद्योगिक कंपन्या आदी वेगवेगळ्या भागांत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. एलईडी व्हॅन तसेच, व्हीएमडीवर आवाहन केले जाणार आहे. जागोजागी पथनाट्ये केले जातील. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘नो युवर वोटिंग सेंटर हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम राबवण्यासाठी महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
मतदारसंघनिहाय सोसायटीतील मतदान केंद्र
पिंपरी-३-६
चिंचवड-९-१३
भोसरी-३-७
एकूण-१५-२६