संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावातील पाण्याचे शुद्धीकरण केले जात नसल्याने तलावातील पाणी घाण झाले आहे. त्यामुळे शहरातील काही तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जलतरण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून नागरिक व खेळाडू नाराजी व्यक्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरुनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील नागरिक, लहान मुले, महिला पोहण्यासाठी जलतरण तलावाकडे जात असतात. पण, महापालिकेचे विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी काही तलाव सुरू आहेत, तर अद्यापही पाच ते सहा जलतरण तलाव बंद आहेत. त्यातच सुरू असलेल्या तलावाचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले की लगेच हाऊसफुल्ल होत आहेत. त्यामुळे नागरिकांसह महिला, लहान मुलांचा हिरमोड होत आहे. हे जलतरण तलाव बंद राहिल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेचे जलतरण तलाव असून त्यातील काही तलावात पाण्याचे शुद्धीकरण केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. महापालिका प्रशासन व ठेकेदाराकडून पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. पोहता येत नसल्याने नागरिक व खेळाडू नाराजी व्यक्त करीत आहेत.
तलाव बंद न ठेवण्याचे निर्देश
तलावाचे पाणी शुद्ध करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात गुरुवारी (दि. २४) बैठक झाली आहे. त्यावर तातडीने कार्यवाही केली जात आहे. कोणताही तलाव बंद राहणार नाही, असे सक्त निर्देश ठेकेदारांना देण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.