संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या शाळांसाठी बाक, टेबल-खुर्ची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, या निविदेतील अटी-शर्थींमध्ये बदल केल्याची माहिती उघड झाली आहे. बदललेल्या अटी-शर्थींमुळे या निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे स्पर्धा होण्यास अडचण येत आहे. निविदा प्रक्रियामधील अटी शर्थी सर्वसमावेशक करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
महापालिका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची, बाक, (बेंच) तसेच, शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी भांडार विभाग यांच्या वतीने २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही निविदा विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र, कागदपत्रानुसार काढण्यात आली आहे. यामध्ये सात वर्षाच्या अनुभवपत्राची मागणी केली आहे. शॉपॲक्टमध्ये फर्निचरचा उल्लेख असावा, अशा अटी- शर्थी आहेत. निविदा प्रक्रियामधील अटी शर्थी तयार करून रिंग तयार केली आहे, या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्थी तयार केल्याने काही ठेकेदारांची रिंग तयार झाली आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
दिल्ली शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांमध्ये बाकांची रचना करणार आहे. दिल्ली दौरा केलेल्या समितीच्या सूचनांनुसार बाकांची मागणी करत आहेत. त्यानुसार निविदा मागवल्या आहेत. सात वर्षाच्या अनुभवपत्राची मागणी केली होती, त्यामध्ये बदल करत एक ते सात वर्षाचा अनुभव असावा, असे केले आहे.
- नीलेश बधाने, साहाय्यक आयुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग