अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे. अजित गव्हाणे यांच्या रुपांत शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात "तुतारी वाजणार आणि बदल घडणार" असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Bhosari Assembly Constituency) अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार निलेश लंके म्हणाले ,राज्यभरात सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष आहे. लोकसभेला मतांच्या रूपात नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरभरून यश दिले. आता विधानसभेलाही परिवर्तन होणार असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या दहा वर्षात या विधानसभा मतदारसंघाने जे भोगले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी येथील जनता आतुर झाली आहे. गेल्या दहा वर्षात मतदारसंघांमध्ये कोट्यवधींचा निधी आला. मात्र नागरिकांना आजही पाण्यासाठी तहानलेले राहावे लागत आहे. रस्ते चांगले नाहीत. जागोजागी खड्ड्यांची स्थिती आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार स्पष्टपणे दिसत आहे. याचे प्रत्युत्तर मतांच्या रूपाने नक्कीच मिळणार आहे. अजित गव्हाणे यांच्या रूपाने या मतदारसंघाला स्वच्छ चारित्र्याचा नेता लाभला आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे या मतदारसंघाचा नक्कीच परिपूर्ण विकास होईल अशी मला खात्री आहे.
अजित गव्हाणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच आपल्याला सार्थ करायचा आहे. जनता भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, दडपशाही यामुळे नाराज आहे. मेट्रो सिटी म्हणून नावाजलेल्या शहरात वीज, पाणी, रस्ते, खड्डे यांसारख्या समस्यांमुळे नागरिक नाराज आहेत. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे.