संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज (दि. २८) हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव 'ग' क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर केला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख नीलेश तरस, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे हे उपस्थित होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. सुवासिनींचे औक्षण, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजर आणि 'अबकी बार, शंकरभाऊ आमदार', 'आले रे आले, कमळ आले', 'अमर रहे, अमर रहे, लक्ष्मणभाऊ अमर रहे', अशा घोषणा देत होते.
गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज १, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळे सौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, बापूजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला सुमारे ३० हजार कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तसेच घरांच्या छतावरून नागरिकांनी शंकर जगताप यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी केली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त उत्साह आणि पदयात्रेला उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी पाहून ही पदयात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयी यात्रेची पूर्वतयारी असल्याची भावना, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अर्ज भरल्यानंतर शंकर जगताप यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचवड विधानसभेतील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला अशीच मनापासून साथ आणि आशीर्वाद द्या, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले.
काटे, कस्पटे, जगताप आणि वाकडकर पदयात्रेत सहभागी
विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेले आणि मागील काही दिवसांपासून ज्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती ते भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी या पदयात्रेत सहभागी होत आम्ही शंकर जगताप यांच्यासोबत असून त्यांना मताधिक्याने आमदार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पदयात्रेदरम्यान थेरगाव येथील शनी मंदिरात असलेल्या गोमातेचे पूजन शंकर जगताप यांनी केले.
भाजपकडून मोठे शक्तिप्रदर्शन
शंकर जगताप यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. यावेळी भाजपसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. जगतापांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ झाला. त्यानंतर पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकरनगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली.