अजित गव्हाणेंनी गपचुप भरला अर्ज; राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाठ, व्हिजनलेस उमेदवार असल्याची चर्चा
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) भोसरी विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी सोमवारी ( दि 28 ) दुपारी दीड वाजता गपचुप जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला शहरातील एकही जागा न दिल्याने पक्षाचे नेते-कार्यकर्ते नाराज आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी (Bhosari Assembly Constituency) या तीनही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याने आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नाही असा पवित्रा, शिवसेनेने घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून अजित गव्हाणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचा एकही नेता अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता.
दुसरीकडे भाजपामधून (BJP) बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले रवी लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. रवी लांडगे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ही जागाच राष्ट्रवादीला देण्यात आल्याने रवी लांडगे हे बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
माजी आमदार विलास लांडे आणि बोटावर मोजता येईल असे मोजके कार्यकर्ते घेऊन अजित गव्हाणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अजित गव्हाणे गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आहेत. भोसरी मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. परंतु, त्यांच्या प्रभागातील अनेक कामे आजही प्रलंबित किंवा संथ गतीने सुरू आहेत.
विद्यमान आमदारांवर आरोप करण्यापलीकडे अजित गव्हाणे यांचे व्हिजन काय असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे.