संग्रहित छायाचित्र
दिवाळी सणानिमित्त भेसळयुक्त अन्नपदार्थ, मावा आणि मिठाई विक्रीवरती अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाते. मात्र, यंदा या विभागाचे मनुष्यबळ विधानसभा निवडणुकीमध्ये गुंतले आहे. परिणामी, दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणारे तपासणीवर मर्यादा येणार असून, नागरिकांच्या घशामध्ये भेसळयुक्त मिठाई पदार्थ जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परिणामी, गौरी गणपती सणाच्या पाठोपाठ यंदाची दिवाळीदेखील खाद्यपदार्थ विनातपासणी बाजारात येत आहेत. दुसरीकडे, तपासणी मोहीम थंडावल्याने व्यापारी आणि मिठाई व्यावसायिक अस्वच्छ व असुरक्षित खाद्यपदार्थ विक्रीला ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीए वतीने काही दिवसांपूर्वीच राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये विविध ठिकाणी तपासणी करून खवा, तूप, दुधाचे पदार्थ, मावा, पनीर यांची तपासणी केली होती. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या परिसरात जवळपास साडेदहा लाख रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले होते. मात्र त्यानंतर हा विभाग थंड पडला असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या दिवाळीच्या तोंडावरती तपासणी मोहीम आवश्यक असताना ती होताना दिसत नाही. शहरात विविध राज्यातून खवा, मावा खासगी वाहनातून येत असतो. त्याची तपासणी करणे आवश्यक असताना, एफडीएचे अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असून, मिठाई विक्रात्यांबरोबरच खाद्यपदार्थांची व्यापारी देखील असुरक्षित आणि अस्वच्छ असा माल ग्राहकांच्या माथी मारू शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई विक्रेत्यांची दुकाने वाढू लागली आहेत. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ स्टॉल आणि ठिकठिकाणी हातगाडीवरही खाद्यपदार्थ विकले जातात. परिणामी, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या अस्वच्छतेबद्दल नेमकी तक्रार कोठे करायची याची नागरिकांना माहिती नसते. परिणामी, नागरिक ती तक्रार देण्याचे टाळतात. दुसरीकडे, कारवाई होत असल्याने संबंधित व्यापारीही त्याबाबत कोणतीही दखल घेत नाहीत.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त आणि निरीक्षक यांना देखील इलेक्शन ड्यूटी लागली आहे. लिपिक आणि शिपाई यांनाही त्या संबंधित कामाचे आदेश प्राप्त झाले आहेत. परिणामी, या विभागातील जवळपास २६ हून अधिकारी दिवसभर निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. परिणामी, त्यांचे मूळ काम असलेले खाद्यपदार्थ तपासणी मोहीम आणि मिठाई भेसळवर वॉच ठेवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये मिठाई विक्रेत्यांची मोठी चलती आहे.
नोडल, झोनल अधिकारी म्हणून नियुक्त
पुणे विभागातील मुख्यतः फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या महत्त्वाच्या ठिकाणी नेमणूक केली आहे. त्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्त म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून तर, फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून नेमणूक असलेल्या इतर जवळपास १६ अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी झोनल अधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर शिल्लक असलेले कर्मचारी लिपिक आणि शिपाई यांना देखील निवडणुकीसाठी बोलावण्यात आले असून, विविध बूथवर नेमणूक केली आहे. परिणामी, तपासणी मोहिमेसाठी अधिकारी शिल्लक नसल्याने नेमकी कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिठाईवरच्या तारखा गायब
प्रत्येक मिठाई विक्रेत्यांना संबंधित मिठाई ही कधीपर्यंत खावी यासाठी त्यावर नेमप्लेट लावणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या सूचना एफडीएच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र बाजारात मिठाई दुकानात त्याची पाहणी केल्यानंतर अशा कोणत्याही तारखा दिसून आल्या नाहीत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी एक्सपायर डेड अगदी एक दोन दिवसावर असलेले खाद्यपदार्थही सर्रास विकण्यात येत आहेत.
प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. निवडणुकीचे कामकाज करून त्यांना ही तपासणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा आढावा मी स्वतः घेणार आहे. नागरिकांनीदेखील दक्ष राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ असल्यास तक्रारीसाठी पुढे यावे. -सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग