पिंपरी-चिंचवड : पूर ओसरला पण पंचनामे सुरूच; महसूल यंत्रणा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचण्यात अपयशी

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या आठवड्यात पावसाचा मोठा तडाखा बसला होता. यामध्ये केवळ नदीकिनारी असणारी घरे नव्हे तर, अनेक सखल भागातही पाणी शिरले असून सखल भागातील रहिवाशांची घरे पाण्याखाली गेली होती.

Pimpri Chinchwad News

पिंपरी-चिंचवड : पूर ओसरला पण पंचनामे सुरूच; महसूल यंत्रणा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचण्यात अपयशी

हजारोंच्या संख्येने घरे पाण्याखाली, आकडा मात्र साडेसात हजार

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या आठवड्यात पावसाचा मोठा तडाखा बसला होता. यामध्ये केवळ नदीकिनारी असणारी घरे नव्हे तर, अनेक सखल भागातही पाणी शिरले असून सखल भागातील रहिवाशांची घरे पाण्याखाली गेली होती. काहींना दोन दिवस तर, काहींना चार दिवस घराबाहेर काढावी लागली होती.  दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास दहा हजारांहून अधिक नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ७ हजार ५१९ नुकसानग्रस्तांचे  पंचनामे केले आहेत. ही तफावत मोठी असल्याने अनेक रहिवासी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्तांपर्यंत तहसील कार्यालयाची कर्मचारी पोहोचलेच नसल्याचे दिसून येते.

संततधर पाऊस आणि नदी नाले भरून वाहू लागल्याने शहरातील नवी सांगवी, कासारवाडी, चिंचवड, पिंपरी गावठाण, गणेशनगर, रावेत, साने चौक, लांडेवाडी या प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. दरम्यान यापैकी काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात देखील पाणी शिरल्याने त्यांना चार ते पाच दिवस बाहेर काढावे लागले. परिणामी, या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दुसरीकडे महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदत मिळाल्याने दिलासा मिळाला. मात्र, पाच ते सहा दिवस उलटूनही नुकसानभरपाई बाबत कोणतीही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. तलाठी, महसूल कर्मचाऱ्यांनी स्वतः त्या-त्या ठिकाणी पाहणी केली. त्याप्रमाणे पंचनामेही केले. मात्र, अजूनपर्यंत ते पंचनामे सुरू असून, बहुतांश रहिवासी वंचित राहण्याची शक्यता आहे.

याबाबत नुकसानग्रस्त स्थानिक नागरिकांनी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन विचारणाही केली. मात्र तुमची माहितीच आमच्या कर्मचाऱ्यांकडून आली नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवण्यात आले.  त्यामुळे नेमकी मदत मागायची कुणाकडे, असा प्रश्न यांना पडला आहे.

तर काही नुकसानग्रस्तांनी, सरकारी कर्मचारी आमच्यापर्यंत आलेच नसल्याचे सांगितले. गत शनिवारी आणि रविवारी महसूल विभागाने दिवसभर काम केले, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात नुकसानग्रस्त नागरिकांपर्यंत हा विभाग पोहोचलाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. पूर ओसरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मदतीने नुकसानग्रस्त पंचनामे सुरू आहेत. मात्र, पाच दिवस उलटूनही ते पूर्ण झाले नसल्याचे दिसले.

कार्यालयात आकडेवारी उपलब्ध नाही

पिंपरी-चिंचवड शहर अंतर्गत अप्पर तहसीलदार कार्यालय आहे. यामध्ये चिंचवड, मोशी, निगडी, देहू आणि भोसरी या मंडळ अधिकाऱ्यांमार्फत जवळपास ३२

गावांचे काम चालते. त्यासाठी आठ तहसीलदार कार्यालयात आहेत. मात्र, प्रत्येक विभागनिहाय माहिती तहसील कार्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे या

नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

...तर मग आमच्याकडे कोण पाहणार

शहरातील विविध ठिकाणी पंचनामे झाले आहेत. मात्र त्या ठिकाणी राजकीय दबाव आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर पंचनामे झाले आहेत. प्रत्यक्षात दापोडी, तळवडे, पिंपरी या ठिकाणच्या नुकसानग्रस्तांपर्यंत पंचानाम्यांची यंत्रणाच पोहोचली नाही. त्यामुळे आमची राजकीय ओळख नसल्याने आमच्याकडे कोण पाहणार, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

सर्वाधिक पंचनामे पिंपरीत

पिंपरी परिसरातील जवळपास साडेचार हजारापर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, त्या पंचनाम्यांच्या फायलींचे काम सुरू असल्याने नेमका आकडा सांगता येत नाही, असे मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी सांगितले. एकूण पंचनाम्यांपैकी पिंपरी परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तरीही अद्याप काही ठिकाणी महसूल विभाग पोहोचला नसल्याचे जाधव म्हणाले आहेत.

Share this story

Latest