द बर्निंग वॉर्ड ! पिंपरी-चिंचवडमध्ये जळीत रुग्ण कक्ष सुरू करण्याबाबत उदासीनता

पिंपरी-चिंचवड शहरातील आगीच्या विविध घटनांत भाजलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळत नसल्याने त्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. जळीत रुग्ण कक्षासाठी जागा पाहणीतच महापालिकेने दीड वर्ष घालवल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Fri, 10 Jan 2025
  • 01:34 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

छायाचित्र: अतुल प्र. बेलोकर

महापालिकेने जागा पाहणीत घालवले दीड वर्ष, रुग्णांची हेळसांड सुरूच

पिंपरी-चिंचवड शहरातील आगीच्या विविध घटनांत भाजलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळत नसल्याने त्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. जळीत रुग्ण कक्षासाठी जागा पाहणीतच महापालिकेने दीड वर्ष घालवल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

शहरातील जळीत रुग्णांना वायसीएम रुग्णालय प्राथमिक उपचार घेऊन त्यांना पुढील औषधोपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात यावे लागत आहे. त्यामुळे शहरात जळीत रुग्ण कक्ष तयार करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागातील डाॅक्टरांना घेऊन वायसीएम, थेरगांव, आकुर्डी, चिंचवड रुग्णालयात पाहणी केली. पण ‘इथे नको, तिथे..’ असे म्हणत दीड वर्ष होऊनदेखील महापालिकेच्या जळीत रुग्ण कक्षाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध  रुग्णालयांची आयुक्त शेखर सिंह यांनी पाहणी केली. त्यानुसार  भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) अगोदर वायसीएम रुग्णालयात तयार करण्यात येणार होता. त्यानंतर यात बदल करून आकुर्डी आणि थेरगांव रुग्णालयातदेखील पाहणी करून चाचपणी करण्यात आली. मात्र, रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज येणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्या रुग्णालयात जळीत रुग्ण कक्ष बनवण्याचा निर्णय रद्द केला.

चिंचवडगाव येथील जुने  तालेरा रुग्णालय हे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर जळीत रुग्ण कक्ष तयार करण्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ठरविले आहे. यासाठी दीड वर्ष लोटूनही कोणतीच तयारी केलेली नाही. तालेरा रुग्णालयात एकूण ३० खाटांचा बर्न वॉर्ड नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही सुरू होऊ शकलेला नाही.

शहरात एकही बर्न वॉर्ड नाही...

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्येत वाढ झाली आहे. आग लागण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. त्या घटनेत जीवितहानी झाल्यानंतर जळीत रुग्ण कक्ष नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होते.

महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (संत तुकारामनगर-पिंपरी), थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय, चिंचवड), भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, जिजामाता रुग्णालय (पिंपरी) आदी रुग्णालये चालविण्यात येतात.

सध्या यातील एकाही रुग्णालयात बर्न वॉर्ड अथवा जळीत कक्ष कार्यान्वित नाही. त्यामुळे, रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालय गाठावे लागते. अथवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. एखाद्या दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला १५ मिनिटांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे, महापालिका रुग्णालयांमध्ये किमान एक तरी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) असणे अत्यंत गरजेचे आहे.

आणखी काही महिने करावी लागेल प्रतीक्षा

जुन्या तालेरा रुग्णालयात नियोजित असलेला जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) पूर्ण क्षमतेचे कार्यरत होण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. जुन्या तालेरा रुग्णालयाचे स्थलांतर नवीन तालेरा रुग्णालयात झाल्यानंतरच या ठिकाणी बर्न वॉर्डचे काम करता येणार आहे. त्यामुळे बर्न वॉर्डसाठी चिंचवडमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तालेरा रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन ते सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डाॅ. लक्ष्मण गोफणे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

दीड वर्ष उलटूनही बर्न वॉर्ड तयार नाही

वर्षभरापूर्वी ८ डिसेंबर २०२३ रोजी तळवडेतील स्पार्कल फायर कॅन्डल बनवण्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत १४ कामगारांचा मृत्यू झाला होता. या आगीमध्ये भाजलेल्यांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नसल्याने गंभीर जखमी महिलांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले होते. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ‘बर्न वॉर्ड’ उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही हा बर्न वॉर्ड प्रत्यक्ष सुरू होऊ शकलेला नाही.

बर्न वॉर्डमध्ये प्रस्तावित सुविधा

एकूण ३० खाटांची क्षमता

सहा आयसीयू बेड

महिला आणि पुरुष वॉर्डात प्रत्येकी १२ खाटा

अत्याधुनिक हायड्रेशन कक्ष

सुसज्ज ऑपरेशन थिएटर

प्लास्टिक सर्जरीची सुविधा

आगीच्या प्रमुख घटना :

ऑगस्ट २०२३ : पूर्णानगर येथे दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

ऑक्टोबर २०२३ : ताथवडे येथे अवैधरित्या गॅस सिलिंडर भरताना स्फोट, स्कूलबसचे नुकसान

डिसेंबर २०२३ : तळवडेतील मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला आग लागून १४ कामगारांचा मृत्यू

जानेवारी २०२४ : वाल्हेकरवाडीतील गोदामाला आग, दोन भावांचा जागीच मृत्यू

फेब्रुवारी २०२४ : मोरवाडीतील भंगार गोदामाला आग, रहिवाशांना तीन दिवस धुराचा त्रास

डिसेंबर २०२४ : चिखली-कुदळवाडीतील भंगार मालाच्या गोदामांना आग; जीवितहानी नाही

Share this story

Latest