संग्रहित छायाचित्र
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या दोन्ही कामांसाठी एकूण १ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारी आहे. हिंजवडी आयटी पार्क तसेच, महामार्गावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. त्याबाबत महापालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त होतात. त्याची दखल घेऊन महापालिकेने या भागातील रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कामासाठी स्थापत्य 'ड' मुख्यालय विभागाने ८९ लाख ५० हजार ९४८ खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी ७ ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या. त्या सर्व निविदा २२ ते ३५ टक्के कमी दराच्या आहेत. त्यात तब्बल ३५ टक्के कमी दराची ५९ लाख ३७ हजार १०३ रुपये खर्चाची सिद्धिकी प्लंबिंग अॅण्ड ड्रेनेज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांची निविदा स्वीकारण्यात आली आहे. कामाची मुदत १२ महिने आहे.
या भागांतील महामार्गाच्या पश्चिमेकडील भागांतील रस्ते दुरुस्तीसाठी ८९ लाख ४८ हजार ८६२ खर्चाची निविदा काढण्यात आली. त्यालाही ७ ठेकेदार पात्र झाले, त्याचेही दर २२ ते ३५ टक्के कमी आहेत. त्यात २५ टक्के कमी दराची ५९ लाख ३५ हजार ८८५ रुपये खर्चाची सिद्धिकी प्लंबिंग अॅण्ड ड्रेनेज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांची निविदा स्वीकारण्यात आली आहे. कामाची मुदत १२ महिने आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. दरम्यान, दोन्ही कामे १० टक्केपेक्षा कमी दराने असल्याने संबंधित ठेकेदाराकडून अनुक्रमे ७१ लाख ३८ हजार रुपये आणि ४१ लाख ३७ हजार रुपये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे.