संग्रहित छायाचित्र
शहरातील मालमत्ताकर थकबाकी असणाऱ्या नागरिकांची नावे, फ्लॅट नंबर, थकीत रक्कम आदी माहिती करसंकलन विभागाकडून ६५१ सोसायटींच्या अध्यक्ष तथा चेअरमन यांना पाठवण्यात येणार आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर, सोसायटीच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये पाठवून, अशा सभासदांना करभरणा करण्यासाठी त्यांनी आवाहन करावे, असे करसंकलन विभागाने नमूद केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांची नोंदणी व आकारणीची कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि. या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांच्या सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी करण्यात आली असून, त्या मालमत्तांना कराचे बिलही देण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या मालमत्तांमध्ये ६९० सोसायट्यांमधील ५६,२३२ मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल देण्यात आले असून यामधून ६५१ सोसायटीमधील ३६,९८० मालमत्ताधारकांचा ६९.५६ कोटींचा कर थकीत आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना एसएमएस, टेलिकॉलिंग या माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार करसंकलन विभागाकडून करण्यात येत आहे.
शहरातील आकारणी न झालेल्या मालमत्तांची नोंदणी व कर आकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. या खासगी कंपनीकडून मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्यात येत आहे. अद्यापही कराचा भरणा न केलेल्या सोसायट्यांमधील मालमत्तांची यादी संबंधित सोसायटी अध्यक्षांना पाठवण्यात येणार असून, सोसायटी अध्यक्षांनी अशा थकबाकीदारांकडे तसे आवाहन करून सहकार्य करावे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
शहरातील सोसायट्यांच्या अध्यक्षांना करसंकलन विभागाकडून करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांची यादी कराच्या थकीत रकमेसह पाठवण्यात येणार आहे. संबंधित सोसायटी अध्यक्षांनी त्यांना पाठवण्यात आलेली यादी सोसायटीच्या ठळक जागी, नोटीस बोर्ड व सोसायटी व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवावी. तसेच मालमत्ताकराची थकबाकी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरण्यासाठी अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा.
- अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त, कर संकलन विभाग, महापालिका