संग्रहित छायाचित्र
राज्य शासनाकडून आयुर्मान संपलेल्या वाहनांकडून पर्यावरणकर आकारण्यात येतो. तो स्थानिक आरटीओच्या माध्यमातून गोळा करण्यात येतो. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढ होत असताना १५ वर्षे जुनी वाहने त्याच पटीत वाढत आहेत. मात्र, आरटीओच्या नियमांची पूर्तता करून पर्यावरणकर ( ग्रीन टॅक्स) भरणाऱ्यांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. दरम्यान, या माध्यमातून गोळा केलेल्या कर हा पर्यावरण विषयासाठी वापरणे आवश्यक असताना सरकारची तिजोरी भरली जात असल्याचे दिसून येते.
मोटार व दुचाकी वाहनांचे १५ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झाल्यावर हवेत १४.३ ते २७.१ ग्रॅम इतका कार्बन मोनॉक्साइड उत्सर्जित होतो. त्यामुळे अशी वाहने सर्वाधिक प्रदूषणास कारणीभूत ठरतात, असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य शासनाने ऑक्टोबर २०१० मध्ये ग्रीन टॅक्स लागू केला. त्यानुसार आरटीओच्या माध्यमातून अशा वाहनांवर कर घेण्यात येतो, तर हा कर चुकवणाऱ्या वाहनांवर आरटीओचे लक्ष असते. त्याची सर्व आकारणी व अधिकार आरटीओकडे देण्यात आले आहेत.
दरम्यान, ग्रीन टॅक्स गोळा करून सरकारी तिजोरीत जमा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये या कराच्या माध्यमातून दोन कोटीहून अधिक महसूल जमा होतो. मात्र, यंदा या महसुलामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षामध्ये वर्षाकाठी वाहनांची संख्या वाढत असल्याने त्या तुलनेत वयोमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची संख्यासुद्धा वाढणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या कराकडे अनेक वाहनांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हा कर भरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गतवर्षी म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये ८ हजार ४५५ वाहनांनी कर भरला आहे, तर त्या माध्यमातून १ कोटी ८० लाख कर जमा झाला आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषणाची पातळीसुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रीन टॅक्स वसूल करून प्रदूषण संवर्धनासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर, हा कर (टॅक्स) लोकांनी का भरावा, असा प्रश्नही पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या कराच्या माध्यमातून पर्यावरण म्हणून तो निधी वापर आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
शुल्क वाढल्याने भरणा करण्याकडे दुर्लक्ष
शासनाच्या आदेशानुसार आरटीओच्या वतीने आयुर्मान संपलेल्या वाहनांवर लादलेल्या करांमध्ये वाढ केली आहे. जुनी वाहने, वयोमर्यादा संपलेल्या वाहनांवर एक हजार ते दीड हजारांच्या पटीमध्ये शुल्कामध्ये वाढ केली आहे, तर ट्रान्सपोर्ट वाहनांना आठ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या अवजड वाहनांसाठी वार्षिक फीदेखील आकारली जाणार आहे. त्यामुळे या शुल्काकडे अनेक वाहनधारकांनी पाठ फिरवली आहे. तसेच, त्यावरती पेनल्टीदेखील आकारण्यात येते.
ग्रीन टॅक्स म्हणजे काय?
जुन्या वाहनांपासून प्रदूषण अधिक होते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यावरील काही खर्च जुन्या वाहनांकडून वसूल केला जावा, त्यासाठी कर गोळा केला जातो. त्यास ग्रीन टॅक्स नाव देण्यात आले. त्यातून मिळणार महसूल पर्यावरण संरक्षणासाठी वापरला जाईल, असे म्हटले आहे.
ग्रीन टॅक्स थकलेल्या वाहनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यामध्ये वाहनावर दंडात्मक कारवाई ते वाहन जप्तदेखील करण्यात येऊ शकते. त्यानुसार लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे.
-राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड