पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत मिठाचा खडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर स्वबळाच्या घोषणांनी राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत काही काळापूर्वी दिले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 02:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत मिठाचा खडा

स्वबळाच्या घोषणेमुळे पालिका निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर स्वबळाच्या घोषणांनी राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत काही काळापूर्वी दिले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षांपूर्वी ही सत्ता उलथवून भाजपने मोठे यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर पातळीवरील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा फायदा भाजपला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत झाला होता. त्यानंतर भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जातात. मागील अडीच वर्षांत राज्यातील सत्तासंघर्षाच्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांना पक्षाकडून राज्यपातळीवर नेहमीच दुय्यम स्थान मिळाले असल्याची खंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच बोलून दाखवली आहे. प्रत्येक कसोटीत अजित पवार यांना साथ देणाऱ्या बनसोडे यांच्याकडे पक्षाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

महायुतीत तणाव; भाजप-राष्ट्रवादीत थेट लढत

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणांमुळे महायुतीत तणावाची परिस्थिती आहे. शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी मिळून महायुतीचा भाग म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शहर पातळीवरील नेत्यांच्या स्वबळाच्या घोषणांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीतील एकत्रित लढ्याची संकल्पना धोक्यात येत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेतृत्व, पक्षांतर्गत गटबाजी, आणि प्रचाराची धोरणे यांचा मोठा प्रभाव राहणार आहे. स्वबळाच्या घोषणांनी एकीकडे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण केली असली, तरी दुसरीकडे महायुतीच्या एकोप्याला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता कोणाच्या हाती येणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

भाजपच्या स्वबळाच्या तयारीची रणनीती

आमदार शंकर जगताप यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा दावा केल्यामुळे भाजपची रणनीती स्पष्ट होत आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद आणि मागील निवडणुकांमधील विजयाच्या जोरावर भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यासारख्या नेत्यांनी शहरातील मतदारांवर मजबूत पकड निर्माण केली आहे.

शरद पवारांनी अजित पवारांचे कौतुक करायला हवे

शरद पवारांनी नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकौशल्याचे कौतुक केले. यावर प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे यांनी, शरद पवारांनी संघाऐवजी अजित पवारांचे कौतुक करायला हवे होते, अशी भूमिका मांडली आहे.

Share this story

Latest