संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना स्वतंत्र नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नववर्षामध्ये पुन्हा या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या आदेशाचे पालन सुरुवातीचे चार दिवस करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये सर्रासपणे मोबाईल दिसून येत आहे.
प्राधिकरण कार्यालयातील वेगवेगळ्या विभागामध्ये कंत्राटी स्वरूपात जवळपास पावणेदोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून ते विविध कार्यालयात वेगवेगळ्या पदावरती काम करत आहेत. शिपायापासून ते अभियंता पदापर्यंतचे कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले आहेत. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना प्राधिकरण प्रशासनामार्फत वेगवेगळे नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये वेळ पाळणे, दिलेल्या कामांमध्ये दर्जा राखणे यासोबतच मोबाईल वापरण्यास मनाई आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये याबाबत प्रशासनाने परिपत्रक काढून प्रत्येक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्याबाबत बंदी घातली आहे. नोव्हेंबरच्या काही महिन्यांमध्ये याबाबत सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू ही सक्ती कमी झाल्याने मोबाईल वापरण्यामध्ये वाढ झालेली आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सुरक्षारक्षकांमार्फत त्याची तपासणी केली जात होती. मात्र, कंत्राटी कर्मचारी ती तपासणी चुकवून मोबाइल आत नेतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा याबाबत पत्रक काढण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. यापूर्वी प्राधिकरणातील गोपनीय कागदपत्रे, परवाने याचे फोटो मोबाईलच्या माध्यमातून बाहेर लीक झाले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मोबाईल वापरावरती निर्बंध आणले होते. मात्र त्याचे पालन होताना दिसून येत नाही.
ड्रेसकोड होणार अनिवार्य
पीएमआरडीए कार्यालयात असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून ड्रेसकोड अनिवार्य करण्यात येणार आहे. संबंधित बीव्हीजी कंपनीने करारात नमूद केल्याप्रमाणे हा ड्रेसकोड कर्मचाऱ्यांना अनिवार्य आहे. त्यामुळे लवकरच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेशभूषेत बदल करावा लागणार आहे. त्यामुळे त्या व्यतिरिक्त इतर कोणताही ड्रेस वापरता येणार नाही.
हेल्मेट सक्तीबाबत ठोस कारवाई कधी?
आकुर्डी येथील कार्यालयात येणारे कर्मचारी, नागरिक अथवा व्हिजिटर्स यांना दुचाकीवर आत येताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणती ठोस कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे येत्या काळामध्ये काय बदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोबाईल बंदीबाबत पुन्हा एकदा सर्व विभागांना सूचना करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. उल्लंघन झाल्यास आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करावी लागणार आहे. -सुनील पांढरे, सह-आयुक्त पीएमआरडीए