पीएमपी स्थानकात रिक्षा आत, बस बाहेर

पीएमपी चालकांना अडथळा होईल, अशाप्रकारे रिक्षा चालवणाऱ्या आणि बसस्थानक, थांब्याच्या परिसरात येऊन पीएमपीचे प्रवासी पळवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी, या रिक्षाचालकांचे फावत असून, प्रत्येक बसथांबा या रिक्षांनी व्यापला आहे.

शहरातील बस थांब्यांना अवैध रिक्षांचा विळखा, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

पीएमपी चालकांना अडथळा होईल, अशाप्रकारे रिक्षा चालवणाऱ्या आणि बसस्थानक, थांब्याच्या परिसरात येऊन पीएमपीचे प्रवासी पळवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी, या रिक्षाचालकांचे फावत असून, प्रत्येक बसथांबा या रिक्षांनी व्यापला आहे.

यामुळे बस थांब्यापासून  पीएमपी लांब उभी करावी लागते तर कधी रस्त्यावरच प्रवाशांना चढ-उतार करावे लागते. एप्रिल महिन्यानंतर कोणतेही प्रकारची ठोस अशी कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कारवाई केल्यानंतरही रिक्षाचालक सुधारत नसल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे.

पीएमपीचे थांबे आणि बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. मात्र रिक्षाचालक या नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीच्या मुख्य स्थानकांच्या परिसरात येऊन प्रवाशांची वाहतूक करतात. बसचालकांना अडथळा होईल, या प्रकारे रिक्षा चालवतात, अशा तक्रारी प्रवासी आणि प्रवासी संस्था, संघटनांनी पीएमपी प्रशासनाकडे सातत्याने केल्या आहेत. शहरातील बहुतांश स्थानकांवर हीच स्थिती आहे. त्यापैकी जुना पिंपरी-चिंचवड मार्ग, डांगे चौक, काळेवाडी, वाकड याप्रमुख पीएमपी स्थानकांत अवैध प्रवासी वाहतूक होते.

या तक्रारींच्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. त्यानुसार वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करण्यात आले. या पथकासोबत पीएमपीकडील चार सेवक आणि एक आरटीओ अधिकारी यांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रत्येकी एक-एक अशी दोन संयुक्त दक्षता पथके स्थापन करण्यात आली. या पथकांकडून वेळोवेळी कारवाई अपेक्षित आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास दीड हजार रिक्षांवर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावल्याने पुन्हा थांब्यांचा ताबा रिक्षाचालकांनी घेतला आहे.

बसचे प्रवासी पळवण्याचे प्रकार

बस थांब्यावर प्रवासी सहज मिळून जातात, यामुळे शहरातील रिक्षाचालक बसथांब्याजवळ घिरट्या मारत असतात. एवढेच नव्हे तर, अनेकदा बस येण्यापूर्वीच प्रवाशांना नेण्याचे प्रकार घडले आहेत. तर, अनेकदा बस मागे उभी असूनही रिक्षाचालक थांब्यावरून हलत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव बस थांब्यापासून काही अंतरावरच उभी राहते.

अपघाताची शक्यता

बसमध्ये उतरताना किंवा चढताना परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. अनेकदा पीएमपी बसचालकाला रस्त्याच्या मधोमध थांबवावी लागते. यामुळे प्रवाशांना बस पकडताना मागून वाहन आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते.  त्याचप्रमाणे बसचालकांनी रिक्षाला पुढे जाण्यास सांगून देखील ते हलत नाहीत.

पीएमपीएल कर्मचारी आणि आरटीओचा फ्लाईंग स्कॉड हे वेळोवेळी कारवाई करत असतात. याबाबत तक्रार आल्यानंतरही कारवाई होत असते. इथून पुढे कारवाई आणखीन तीव्र करण्यात येईल.

- राहुल जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

डांगे चौकामध्ये अर्ध्याहून अधिक रस्ता रिक्षाचालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे बसची वाट पाहात रस्त्यात थांबावे लागते. अपघाताची भीती असते. तर, बस थांब्यावरील प्रवासी रिक्षाचालक नेहमीच पळवतात.

- प्रदीप सूर्यवंशी, आयटी कर्मचारी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest