हिंजवडी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू

पिंपरी-चिंचवड शहरापाठोपाठ हिंजवडी रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. हिंजवडी टप्पा दोन व तीन या मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे आयटियन्सचा मार्ग बिकट झाला होता. मात्र, पीएमआरडीएकडून आठ दिवसांची मुदत देण्यात आल्यावर मेट्रोकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रामुख्याने माण मेट्रो स्थानकापर्यंत हे काम सुरू झाले आहे.

पीएमआरडीएने दिली आठ दिवसांची मुदत, साडेचारशेपैकी दोनशे खड्डे बुजवल्याचा

पिंपरी-चिंचवड शहरापाठोपाठ हिंजवडी रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. हिंजवडी टप्पा दोन व तीन या मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे आयटियन्सचा मार्ग बिकट झाला होता. मात्र, पीएमआरडीएकडून आठ दिवसांची मुदत देण्यात आल्यावर मेट्रोकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रामुख्याने माण मेट्रो स्थानकापर्यंत हे काम सुरू झाले आहे. साडेचारशेच्या आसपास खड्डे पडले होते. त्यापैकी २०० खड्डे बुजवण्यात आले असून, उरलेले खड्डे देखील लवकर बुजवण्याची सूचना दिली आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये जगातील आणि देशांतील मोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. या पार्कमध्ये एकूण २०० आयटी कंपन्या कार्यरत असून, तीन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या काही दिवसांपासून या पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता या पार्कमधील खड्डेमय रस्त्यांमुळे येथील पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा समोर आला आहे. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक रोज एक ते दीड तास कोंडीत अडकून पडत आहेत.

दरम्यान,  कामगार पुतळा ते माण मेट्रो स्टेशन या दरम्यान रस्त्यावर पडलेला खड्डा दुरुस्ती करण्यात आली आहे. मध्यंतरी सर्वेक्षणामध्ये जवळपास ४५० खड्डे असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान त्यापैकी निम्मे खड्ड्यांची दुरुस्ती केली असल्याची माहिती पीएमआरडीए वतीने देण्यात आली.

याबाबत पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता रीनाज पठाण यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली होती. यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत ५० टक्के खड्डे बुजवण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लवकर खड्डे दुरुस्त झाले आहेत. मध्यंतरी पाऊस आल्यानंतर काम संथ झाले होते. मात्र येत्या आठवडाभरात संपूर्ण काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अखेर मेट्रोने  स्वीकारली खड्ड्यांची जबाबदारी

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो कामादरम्यान हिंजवडी टप्पा दोन आणि तीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यानंतर हे खड्डे नेमके कोण बुजवणार याबाबत एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू होते. एमआयडीसीने ही जबाबदारी मेट्रोची असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पीएमआरडीए आयुक्तांनीही खड्ड्यांबाबत आढावा घेतला होता. यानंतर मेट्रोने ते खड्डे बुजवावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest