‘ती’ नुकसान भरपाई अधिकाऱ्यांकडून वसूल करा

नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी जागतिक बँकेकडून २०१५ मध्ये १५९ कोटी ११ लाख कर्ज घेतले. त्या कर्जामुळे महापालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी करावी. दोषींवर कारवाई करून झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली. ‌

जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज डॉलरमध्ये फेडण्याच्या अटीमुळे महापालिकेला जबर फटका

नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी जागतिक बँकेकडून २०१५ मध्ये १५९ कोटी ११ लाख कर्ज घेतले. त्या कर्जामुळे महापालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी करावी. दोषींवर कारवाई करून झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली. ‌

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने कासारवाडीतून भोसरीच्या दिशेने जाणारा व भोसरीकडून पिंपळे गुरव भागाला जोडणारा अशा दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असताना १५९ कोटी ११ लाख जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. हे कर्ज २५ वर्षे फेडावे लागणार आहे‌. हे कर्ज डॉलरमध्येच फेडायचे आहे.

भविष्यात डॉलरचा भाव जसा वाढत जाईल तशी या कर्जाची रक्कम वाढणार आहे. डॉलरनुसार परतफेडीच्या जाचक अटीमुळे हे कर्ज तब्बल ३० टक्के वार्षिक व्याजदराने पडत आहे. भारतातील राष्ट्रीय बँकेचा व्याजदर ७ ते १४ टक्के असताना हा ३० टक्क्याच्या दराने कर्ज घेण्याचा  निर्णय कोणाच्या सुपीक डोक्यातून आला? यामुळे महापालिकेचे किती आर्थिक नुकसान झाले? याला जबाबदार कोण?

आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे हे कर्ज एक रकमी फेडण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. मात्र कर्जाच्या अटी-शर्ती नुसार हे कर्ज जागतिक बँक स्वीकारत नाही.  महापालिकेने जागतिक बँकेकडून १५९ कोटी ११ लाखांचे कर्ज जानेवारी २०१५ मध्ये घेतले होते. आत्तापर्यंत महापालिकेने ११० कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अद्याप २०७ कोटी रुपये कर्ज फेडायचे आहे.

डॉलरची किंमत जशी-जशी वाढत जाईल, तशी-तशी या कर्जापोटी वाढणारी रक्कम महापालिकेला फेडावी लागणार आहे. हे कर्ज घेण्याचा करारनामा कोणी केला? या प्रक्रियेचा सल्लागार कोण होता? महापालिकेचे कायदा सल्लागार, लेखापाल, लेखापरीक्षक नक्की काय करत होते? या प्रक्रियेत कोण कोण अधिकारी, पदाधिकारी सहभागी होते?

या सगळ्या प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाण- घेवाण होऊन भ्रष्टाचार झाला काय? महापालिकेला कर्जबाजारी करण्याचे पाप नेमके कोणाचे? महापालिकेला कर्जबाजारी करून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या संबंधित भ्रष्ट लोकांची, या एकूणच या सर्व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest