पिंपरी-चिंचवड : ‘पीएमआरडीए’ साडेसहा हजार सदनिका उभारणार
सर्वसामान्यांना वाजवी दरात घरे मिळण्यासाठी काम करणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सेक्टर १२ (मोशी प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी) येथे गृहप्रकल्प राबविण्यात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्प १ व २ मध्ये ४८८३ सदनिका उपलब्ध झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून यात ६४५२ सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना परवडणारी घरे मिळणार आहेत. त्याचे जवळपास २५ टक्के काम पूर्ण झाले असून, ४७ इमारतींपैकी २२ इमारतींचे पहिल्या माळ्याचे काम पूर्ण झालेले आहे.
सेक्टर १२ मधील पहिल्या टप्प्यातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ८८३ सदनिका उभारण्यात आल्या होत्या. प्रशस्त इमारत आणि सर्व सुविधांयुक्त सदनिका उभारल्या आहेत. पहिल्या टप्प्याचा मोठा प्रतिसाद लक्षात घेता, दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची गती वाढवली आहे. सर्व परवानगी आणि कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रकल्प सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले
दरम्यान, गृहप्रकल्प ३, ४, ५ या प्रकल्पाखालील ११.६३ हे.आर. क्षेत्र असणार आहे. या प्रकल्पात एकूण सदनिका ६ हजार ४५२ उभारण्यात येतील. त्यापैकी ईडब्ल्यूएस ए-टाइप (१ बीएचके) ३ हजार ३२०, ईडब्ल्यूएस बी-टाइप (१ आरके) ३३२, एलआयजी ए (२ बीएचके) १ हजार ४५६, एलआयजी बी (२ बीएचके) १ हजार ३४४ आणि ८३ व्यावसायिक दुकाने उभारण्यात येणार आहेत. वन बीएचके जास्त मागणी लक्षात घेता येथे सर्वाधिक फ्लॅट हे वन बीएचकेचे असणार आहेत.
असा आहे प्रकल्प
इमारती - ४७ (पार्किंग + १४ मजली) (प्रीकास्ट तंत्रज्ञान) आहे. एकूण निविदा रक्कम ७३० कोटी रुपये आहे. इमारती संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) कडील प्राप्त कन्सेंट टू एस्टाब्लिश ऑर्डर - २१ जून २०२३ ची आहे. प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) मान्यतेसाठी नोडल अधिकारी, म्हाडा यांच्याकडे सादर केला आहे. निविदा प्रक्रिया करून कंत्राटदारास १० जुलै २०२३ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती
२२ इमारतींच्या पहिल्या मजल्याची उभारणी
११ इमारतींच्या पायाचे काम पूर्ण
पाच इमारतींच्या खोदाईचे काम पूर्ण
आठ इमारतींच्या खोदाइचे काम प्रगतीवर
एका इमारतीचे काम सुरू होणे बाकी
सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर आहे. लाॅटरी पद्धतीने लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सदनिकांचे चटई क्षेत्र
ईडब्ल्यू एस ए-टाइप (१ बीएचके) - २९.५५ चौ.मी.
ईडब्ल्यूएस बी-टाइप (१ आरके) - २५.७० चौ.मी.
एलआयजी ए- टाइप (२ बीएचके) - ५९.२७ चौ.मी.
एलआयजी बी -टाइप (२ बीएचके) - ४८.८९ चौ.मी,
सर्वात मोठा फ्लॅट हा जवळपास ४९ चौरस मीटरचा असणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ५९४ सदनिका, १८ दुकाने शिल्लक
सेक्टर १२ मधील पहिल्या टप्प्यातील ५९४ सदनिका शिल्लक आहेत. १८ दुकानांची विक्रीही बाकी आहे. याचीही सोडत लवकरच काढण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू आहे. जून अखेरपर्यंत ३ हजार ८७९ घरांचा ताबा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे १२५ दुकानांपैकी ६५ दुकानांचा ताबाही दिला आहे.