पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या नेत्र रुग्णालयात रुग्णांचे हाल
महापालिकेच्या मासूळकर काॅलनी परिसरातील नेत्र रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासह त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात येत असून त्यांना बैठक व्यवस्था नाही. रुग्णालय साफसफाई होत नसून शौचालय देखील वारंवार ब्लाॅक होत आहे. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांना हेळसांड होत आहे.
पिंपरीच्या मासूळकर काॅलनीत महापालिकेने आय (नेत्र) रुग्णालय उभारले आहे. नव्याने उभारलेल्या रुग्णालयात डोळे तपासणी, शस्त्रक्रियेसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येत आहे. रुग्णासह नातेवाईक देखील रुग्णालयात येत असल्याने त्यांना कुठेही बैठक व्यवस्था नाही.रुग्णालयात डोळे तपासणीस आलेल्या रुग्णांना बसण्यास पुरेशी जागा नसल्याने अनेक रुग्णांना ताटकळत उभा राहावे लागत आहे. रुग्णांना बसण्यास बाकडे देखील नाहीत. त्यांचे नातेवाईक देखील उभे राहत असतात. रुग्णालयात शौचालय वारंवार ब्लाॅक झाल्याने ते बंद अवस्थेत असते. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या नेत्र रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांना बसण्यासाठी वेटींग रुम तयार करावी, तपासणी व शस्त्रक्रियेला आलेल्या रुग्णांना बसण्यासाठी बेंचची संख्या वाढवावी. रुग्ण व नातेवाईकांना माहिती दर्शविण्यासाठी एलईडी टीव्ही स्क्रीन लावण्यात यावेत. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकाना त्यांचा तपासणीला कधी नंबर लागेल, यांची माहिती मिळेल. रुग्णालयाची व शौचालयाची योग्य ती साफसफाई देखील करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
शस्त्रक्रियेसाठी रुग्ण वेटिंगवर..
नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रियांसाठी एकूण ३ शस्त्रक्रिया कक्ष आहेत. मात्र, २ शस्त्रक्रिया कक्षच सध्या वापरात आहे. तिसर्या शस्त्रक्रिया कक्षात मायक्रोस्कोप नसल्याने ते वापराशिवाय पडून आहे. दिवसाला १० ते १५ शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. रेटिनाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात सर्जन आणि आवश्यक साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे या शस्त्रक्रियांचा अटकाव बसला आहे. त्यामुळे नेत्र रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी महिनाभराचे वेटिंगवर आहेत. त्यामुळे आता डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना वेळ लागत असून रुग्णांची गैरसोय होत आहे.