पिंपरी-चिंचवड : शहरात प्लास्टिकबंदी: कागदावरच

पिंपरी-चिंचवड शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्लास्टिकबंदी असतानाही, प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधातील कारवाई मंदावली आहे. महापालिकेने आपल्या पर्यावरण स्थिती अहवालात २०२३-२४ मध्ये शहरात दररोज ३५ टक्के प्लास्टिक संकलन झाल्याचा दावा केला आहे.

प्लास्टिकबंदी असूनदेखील प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई थंडावली

पर्यावरण अहवालातून महापालिकेची कबुली, कारवाईचे प्रमाणही कमी; पर्यावरणप्रेमींची नाराजी

पिंपरी-चिंचवड शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिकबंदी असूनदेखील प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई थंडावली आहे. महापालिकेने स्वत:च पर्यावरण सद्यस्थिती अहवालात शहरात २०२३-२०२४ मध्ये दिवसाला ३५ टक्के प्लास्टिक संकलन झाल्याचा दावा केला आहे. यावरून आता पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ पासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू आहे. प्लास्टिक अविघटनशील असल्यामुळे राज्य सरकारने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर २३ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर पिंपरी महापालिकेकडून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु, शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू आहे. कारवाईचे प्रमाणही कमी आहे.

महापालिकेने २०२३-२०२४ चा पर्यावरण अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात शहरात ११०० ते १३०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. त्यात धातू ०.५ टक्के, कापड १० टक्के, लाकूड १.५ टक्के, अन्न व उद्यानातील कचरा ३८ टक्के, प्लास्टिक ३५ टक्के, ग्लास २ टक्के, कागद व थर्माकॉल १ टक्के, रबर १ टक्के, इनर्ट १० टक्के, ई-कचरा १ टक्के असे कचऱ्याचे संकलन होत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. पुनर्प्रक्रियेसाठी जाणारे प्लास्टिक भंगारात विकले जाते. परंतु, बंदी असलेले प्लास्टिक कचऱ्यात येते. त्याच प्लास्टिकचे ३५ टक्के संकलन झाल्याने पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेने तयार केलेला पर्यावरण अहवालात काही तरी गडबड आहे. शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकवर कारवाई केली जाते, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात सद्यस्थितीच्या पर्यावरण अहवालानुसार ३५ टक्के प्लास्टिक गोळा होत असल्याची कबुली प्रशासन देत आहे. यावरून प्लास्टिक वापरावर कारवाई होत नसून शहरात प्लास्टिक कॅरिबॅगचे सहज उत्पादन, वितरण आणि वापर सगळीकडे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

- चंद्रशेखर पवार, पर्यावरणप्रेमी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest