पिंपरी-चिंचवडलाही होणार आयआयएम

आयआयएम नागपूर ची शाखा भोसरी येथील मोशी भागात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ७० एकर जागा आरक्षित करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयआयएम पिंपरी-चिंचवडमध्येही सुरू होणार आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना यावेळी मंजुरी आणि गती देण्यात आल्याचे आमदार महेश लांडगे यांनी कळवले आहे.

'आयआयएम नागपूरची शाखा मोशीतील ७० एकरात उभी राहणार

आयआयएम नागपूर ची शाखा भोसरी येथील मोशी भागात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ७० एकर जागा आरक्षित करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयआयएम पिंपरी-चिंचवडमध्येही सुरू होणार आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना यावेळी मंजुरी आणि गती देण्यात आल्याचे आमदार महेश लांडगे यांनी कळवले आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीला पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, नगररचना विभागाचे संचालक प्रसाद गायकवाड यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागाचे अप्पर सचिव, महसूल विभागाचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या अनेक विकास प्रकल्पांना गती या बैठकीत देण्यात आली. तसेच काही नियोजित प्रकल्पांसाठी जमिनी आरक्षित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे आमदार लांडगे यांनी कळवले आहे. आयआयएम बरोबरीनेच पुढील निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.

१) पिंपरी-चिंचवडमध्ये रेड झोन, ब्ल्यू लाईनसारख्या प्रतिबंधित क्षेत्रासाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) व वार्षिक मूल्यदर निर्देशांकमध्ये सुधारणा करणेबाबत नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत.

२) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गृहयोजनेतील १ ते ४२ पेठांमधील ११ हजार २२३ सदनिका पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत.

३) पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रोच्या नवीन मार्गाचा विस्तार करण्याबाबत ‘डीपीआर’ करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

४) पिंपरी-चिंचवडमधील डुडूळगाव येथील वनक्षेत्रावर इको टूरिझम पार्क विकसित करणेबाबत १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

५) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय भवन उभारण्यासाठी नवीन इमारत बांधकाम प्रशासकीय बांधकाम मान्यता व निधीबाबत प्रस्तावास मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.

६) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण संदर्भातील प्रस्तावित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

७) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्याबाबत राज्यातील अन्य भूखंड ‘फ्री होल्ड’ करण्याची प्रकरणांवर एकत्रितपणे कॅबिनेट बैठकीत आगामी १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.

८) पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला (नमामी इंद्रायणी)  चालना देण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा. त्याद्वारे पर्यावरण विभागाशी संबंधित ‘क्लिअरन्स’ आणि अन्य बाबतीत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक टॅक्स भरून आम्हाला फक्त खड्डेच का ?

'सर्वात जास्त टॅक्स भरायचा चिंचवडकरांनी आणि मोठे रोड, कोर्ट, कमिशनर ऑफिस, मोठे गार्डन, कॉलेज कुठे तर भोसरीकडे आणि चिंचवडकर कुठे तर खड्ड्यात" अशा आशयाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात आयआयएम नागपूरची शाखा सुरू करण्याकरिता जागा आरक्षित करण्यात आल्याची माहिती आमदार लांडगे यांनी ट्विट द्वारे दिली. हे ट्विट पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी फेडरेशनच्या विविध व्हाट्सअप ग्रुपवरती व्हायरल झाले. मात्र यावेळी चिंचवड परिसरातील नागरिकांनी संतप्त होत एक खोचक प्रतिक्रिया यावेळी दिली असून आता ही प्रतिक्रिया देखील तेवढीच जोरात व्हायरल होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्राधिकरण हद्दीतील नागरिकांच्या मिळकती ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत आगामी कॅबिनेट बैठकीत अंतिम निर्णय होईल. यासह इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प, महावितरण संदर्भातील प्रलंबित कामे, पोलीस आयुक्तालय उभारणीसाठी निधी, इको टूरिझम पार्क, मेट्रोचे नवीन मार्ग विकसित करणे यासह प्रतिबंधित क्षेत्रातील एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये बदल करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे. तसेच, आयआयएम, नागपूर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेचा शाखाविस्तार पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यासाठी ७० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या दृष्टीने महायुती सरकार सकारात्मक भूमिकेतून निर्णय घेत आहे, ही बाब शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.

-महेश लांडगे, आमदार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest