संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: 'जल्लोष शिक्षणाचा’ या योजनेंतर्गत थेरगावचे यशवंतराव चव्हाण उर्दू प्राथमिक शाळा, चिंचवडगावचे हुतात्मा चापेकर विद्यामंदीर, भोसरीचे इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा, पिंपरीचे संत तुकाराम नगर मुले प्राथमिक शाळा, पिंपळेगुरवचे प्राथमिक शाळा क्र. ५४, चिंचवड स्टेशनचे फकीरभाई पानसरे उर्दु प्राथमिक शाळा अशा सहा शाळामध्ये स्थापत्यविषयक कामे करुन कायापालट करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मंगळवारी, ( दि.९) स्थायी समिती सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. (Pimpri Chinchwad)
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती व महासभेची बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ३ बुर्डे वस्ती, पठारेमळा व लगतच्या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती एम.पी.एम, हॉटमिक्स पद्धतीने करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील विविध रस्त्यावरील चरांची व डांबरी रस्त्यांची दुरूस्ती हॉटमिक्स पद्धतीने करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ११ मधील सुदर्शननगर, शरदनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक ८ मधील श्वान दफनभूमी येथील मोकळ्या जागेमध्ये डॉग केज आणि शेड्स, इतर स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली परिसरातील विविध रस्त्यांचे खडीकरण व बीबीएम करण्यासाठी तसेच ताब्यात आलेल्या रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी, चऱ्होली, मोशी आदी ठिकाणचे रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन हयातीचा दाखला देण्यासाठी केवायसी करण्याच्या अनुषंगाने एजन्सीची नेमणुक करण्यासाठी आणि महापालिकेच्या मंजुर विकास योजनेतील मौजे तळवडे येथील १८ मीटर रूंद डी.पी रस्ता, भारत वजन काटा ते सोनावणे वस्तीला जोडणारा १८ मीटर रूंद डी.पी रस्ता, मौजे थेरगाव येथील नियोजित १२ मीटर रुंदीच्या रस्ता, मौजे थेरगाव येथील नियोजित १२ मीटर रूंदीचा रस्ता या रस्त्यांमधील बाधित जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील तळेगाव औद्योगिक क्षेत्र फेज-२ मधील महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेसाठी ब्रेक प्रेशर (बी.पी.टी) बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख परिसरात पावसाळी पाण्याची लाईन टाकण्यासाठी व स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विद्यानिकेतन निगडी मुले/मुली शाळा क्र. १ या इमारतीची स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी आणि महापालिका मुख्य कार्यालय, इतर विविध कार्यालयातील संगणकीय केबल नेटवर्कचे कामकाजासाठीच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ३ येथे ठिकठिकाणच्या रस्त्यांची दुरूस्ती खडीकरणाने व एम.पी.एम पद्धतीने करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथील परिसरात पावसाळी लाईन टाकण्यासाठी, रस्ता दुभाजक, पदपथांची स्थापत्य आधी कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
मौजे चोवीसावाडी, मौजे वडमुखवाडी, व मौजे चऱ्होली येथील मंजूर विकास योजनेतील ९० मीटर रस्त्याच्या प्रयोजनाकरिता जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक ४ दिघी येथील पुर्व भागातील रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठीच्या खर्चास आणि सन २०२३-२४ ची संचलन तूट रक्कमेपैकी अग्रिम रक्कम पीएमपीएमएल संस्थेस देण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक १५ मधील हेडगेवार भवनाजवळ अग्निशमन केंद्र उभारण्याचा अंदाजपत्रकात समावेश करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच अनामत ठेव पद्धतीने पवना नदीवर मौजे शिवणे व मौजे गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारा बांधण्याच्या अंदाजपत्रकीय रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.