संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महापालिका कर्मचारी महासंघाचे थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवनात शनिवारी दि. २३ नोव्हेंबरला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार मतमोजणीसाठी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन हे ठिकाण निश्चित केले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५६४ मतदान केंद्र करण्यात आली. त्यात एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार होते. या मतदारांमध्ये ३ लाख ३८ हजार ४५० पुरूष, ३ लाख १५ हजार ११५ महिला व ५७ इतर मतदार आहेत. त्यानूसार सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत ३ लाख ८७ हजार ५२० मतदारांनी मतदान केले असून एकूण ५८.३९ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यात २ लाख ३ हजार ७८१ पुरुष मतदार तर १ लाख ८३ हजार ७२४ महिला मतदार आहेत. त्यामुळे यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३ लाख ३१ हजार ८६१ व इतर १५ मतदारांनी मतदान केले आहे.
मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षणही दिले आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे.
मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलिस यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. अग्निशमन तसेच वैद्यकीय पथकही ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वाहनतळाची पुरेशी व्यवस्था
मतमोजणीसाठी येणारे मनुष्यबळ व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पवार यांनी दिली.