ही मुळा नदी की कचरा डेपो? नदी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास

मुळी नदी दिवसेंदिवस प्रदूषण वाढू लागले आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील काही कंपन्यातून थेट रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी सोडले जात आहे. त्यातच आता मुळा नदी पात्रात माण ग्रामपंचायतीनेदेखील कचरा डेपो बनविला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Fri, 22 Nov 2024
  • 03:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मुळी नदी दिवसेंदिवस प्रदूषण वाढू लागले आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील काही कंपन्यातून थेट रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी सोडले जात आहे. त्यातच आता मुळा नदी पात्रात माण ग्रामपंचायतीनेदेखील कचरा डेपो बनविला आहे. 

ग्रामपंचायत हद्दीसह परिसरातील दररोज २० ते २५ टन कचऱ्यांचे संकलन केले आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यातील बहुतांश कचरा हा पाण्यात वाहूनदेखील जात आहे. त्यामुळे नदी पात्रातील कचरा डेपोने मुळा नदी आणखी प्रदूषित होवू लागली आहे. याकडे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागासह हरित लवादानेदेखील दुर्लक्ष केले आहे.  

राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण ग्रामपंचायत हद्दीत शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यातील रसायन मिश्रित पाणी, सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करण्यात येत नाही. याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तयार केलेला सांडपाणी प्रक्रियेचा एसटीपीदेखील कार्यान्वित नाही. 

त्यामुळे ह्या कंपन्याचे सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट नदी सोडून मुळा नदीची गटारगंगा झालेली आहे. त्यामुळे नदीतील जलचर पाणी मृत्युमुखी पडत आहेत. त्यातच आता माण ग्रामपंचायत नदी पात्रात तयार केलेल्या कचरा डेपोमुळे मुळा नदीच्या प्रदूषणात आणखी भर पडणार आहे.

मुळा नदी पात्रात माण ग्रामपंचायतीने आपल्या हक्काचा कचरा डेपो बनविला आहे. नदी पात्रात एका शेतक-याच्या खाजगी जागेत दररोज २० टन कचऱ्यांचे संकलन होत आहे. मात्र, पावसामुळे नदीला पूर आल्यास नदी पात्रात ठेवलेला कचरा वाहून जात आहे.

मुळा नदीकाठच्या बहूतांश ग्रामपंचायतीने नदी पात्र हे कचऱ्याचा डेपो बनविला असून त्याचा हिंजवडी सह बालेवाडी, बाणेर भागातील अनेक सोसायटी नागरिकांना त्रास होत आहे. नदीकाठच्या अनेक सोसायट्या नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करुन पिण्यासाठी पाणी वापर सुरु आहे. त्या सोसायट्यांना दुर्गंधी आणि केमिकल्सयुक्त पाणी प्यावे लागत आहे. कचऱ्यामुळे नदीचे दूषित होणा-या पाण्याचे करायचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

माण ग्रामपंचायतीने मुळा नदी पात्रात कचरा संकलन केंद्र तयार केले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दररोज २० ते २५ टन कचरा संकलन केला जात आहे. त्या कच-यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी नदी पात्रात खाजगी जागेवर संकलन डेपो तयार केला आहे. त्या कचरा संकलन डेपोमुळे अनेक सोसायट्यांना त्रास होवू लागला आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टीने मुळा-मुठा नद्यांना पूर येत असतो. या पुरामुळे माण ग्रामपंचायतीने नदी पात्रात तयार केलेला कचरा संकलन डेपोतील कचरा वाहून जात आहे. त्या वाहून जाणा-या कच-यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. शिवाय कच-यातून दुर्गंधी व केमिकल्सयुक्त पाणी देखील नद्यांमध्ये मिसळत आहे.

माण ग्रामपंचायतीने टाकलेल्या कचऱ्यामुळे नदी काठच्या ब्लू रिज टाऊनशिप, हिंजवडी, सेन्सोरियम, माण, जाॅयविले हिंजवडी-माण, यशोने माण यासह अनेक सोसायटीतील नागरिकांना कच-यांच्या दुर्गंधीसह दुषित पाण्याचा मनस्ताप होत आहे. यातील ब्लू रिज टाऊनशिप, सेन्सोरियम आणि जाॅयविले सोसायटीना पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून थेट पाणी पुरवठा होत आहे.

नदीत कचऱ्याचे केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने सोसायट्यांना दूषित पाणी मिळू लागले आहे. मागील काही दिवसात अनेक सोसायटीच्या पिण्याच्या पाण्यात लाल अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे दूषित पाण्यामुळे किटकजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. या कच-यामुळे सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन डेपोमुळे मुळा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त होवू लागले आहे. या नदीत बहुतांशी ग्रामपंचायती नदी पात्रात कचरा टाकला जात आहे. नदीत चक्क कचऱ्याचे डोंगर तयार होवू लागले आहेत. तर काही कंपन्या व कारखाने रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडत असून मुळा नदीतील दुषित पाण्याचे करायचे काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मुळा नदी पात्रात ग्रामपंचायती कचरा तर कारखाने व कंपन्या मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी थेट नदीपत्रात सोडत आहेत. त्यामुळे नदीचे पाणी दुषित झाले आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायत, कंपन्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story