संग्रहित छायाचित्र
संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल होत असून माऊलींच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात. यावर्षी २३ नोव्हेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु होत आहे.
माऊली मंदिरात होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाली आहे. कैवल्यचक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा यंदा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची पालखीसुद्धा काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. या सोहळ्याची सुरुवात २३ नोव्हेंबर रोजी परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारवर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होणार आहे, तर मुख्य संजीवन समाधी सोहळा हा २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान होणार आहे. या सोहळ्याची सांगता १ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १२.३० च्या दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होणार आहे. या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज पवमान अभिषेक, दुग्धारती, महापूजा , नैवद्य ,भजन ,कीर्तन ,पारायण हे परंपरेनुसार होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
अशी असणार संजीवन समाधी सोहळ्यातील प्रमुख कार्यक्रमाची रूपरेषा.....
२३ नोव्हेंबर सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वारावर परंपरेनुसार हैबतबाबा यांचे पायरी पूजन गुरू हैबतबाबा यांच्या वंशजांच्या हस्ते.....
२६ नोव्हेंबर दुपारी १ वाजता माऊलींची नगर प्रदक्षिणा होईल
२७ नोव्हेंबर दुपारी ४ ते ७ दरम्यान माऊलींचा रथोत्सव संपन्न होईल
२८ नोव्हेंबर सकाळी ९ ते १२ पर्यंत हभप नामदास महाराज दास यांचे कीर्तन त्यानंतर दुपारी १२ दरम्यान मुख्य संजीवन समाधी सोहळा आणि माऊलींच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, घंटानाद आणि आरती होईल
१ डिसेंबर रात्री ९.३० ते १२.३० च्या दरम्यान माऊलींचा छबिना निघेल. त्यानंतर आरती होईल.