निवडणूक निकालापूर्वीच चिंचवडमध्ये विजयाचे लागले बॅनर
चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन नगर येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी शंकर जगताप यांच्या विजयानिमित्त अभिनंदनचा फलक लावला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात थेट लढत झाली आहे. बुधवारी (दि.२०) रोजी मतदान पार पडले, निवडणूक निकाल शनिवारी (दि.२३) लागणार आहे.
मतदान प्रक्रिया संपताच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी सुदर्शन नगर चौकात “नव्या पर्वाचं कणखर नेतृत्व.. शंकरभाऊ जगताप यांची चिंचवड विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” अशा आशयाचा फलक लावला आहे.
आता शनिवार (दिनांक २३) रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच नेमकं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. परंतु निकालापूर्वीच लावण्यात आलेल्या या फलकाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे.